लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून त्यात ऐरोली सेक्टर पाच येथील रेल्वे भुयारी रस्त्याचे तुळई कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच विभाग अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचले. मात्र याच गर्डरवरून महावितरणची केबल असल्याने केवळ वाहतूक वळवली जात होती. सुमारे अर्धा-पाऊण तासाने महावितरण आणि रेल्वे अधिकारी आल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली गेली.

ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली सेक्टर ३ कडे जाण्यासाठी ठाणे-पनवेल रेल्वे पुलाखालून भुयारी रस्ता आहे. याच ठिकाणी रेल्वे पुलाची उंची फार जास्त नसल्याने भुयारी रस्त्यामधून उंच वाहनांना प्रवेशबंदी आहे. तसेच दोन्ही बाजूंनी तुळई अर्थात लोखंडी आयताकृती कमान उभी करण्यात आली आहे. आज दुपारी ऐरोलीकडील कमान धोकादायकरीत्या एकीकडे कलली, त्यामुळे ती कधीही कोसळेल अशा अवस्थेत होती.

आणखी वाचा-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करा, नवी मुंबई महापालिकेची एपीएमसीला नोटीस

याबाबत माहिती मिळताच ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे आणि आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचले. मात्र याच कमानीला लागून महावितरणची केबल असल्याने काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे कचरा वहन करणाऱ्या दोन गाड्या आडव्या उभ्या करून वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता. वाहतूक पोलीसही आल्यावर वाहतूक नियंत्रित झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरण आणि रेल्वेने काम सुरू केले असून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कमान बाजूला करून तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे विभाग आणि महावितरण विभागाच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाहीत.