नवी मुंबई : सोमवारी सकाळी शीव-पनवेल मार्गावर वाशी खाडीपूल आणि खारघर येथे कंटेनरचे अपघात झाले. परिमाणी शीव-पनवेल मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. पहाटे साडेपाच ते दुपारी १२ पर्यंत वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले. दुपारी १२ नंतर मात्र हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.
मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरचे ऐन खाडीपुलावर ब्रेक फेल झाले, त्यामुळे आहे त्याच जागेवर कंटेनर चालकाने थांबवला. त्यात पाऊस सुरू असल्याने मागून येणाऱ्या कंटेनर चालकाला थांबलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने मागून धडकला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र काही वेळातच तीन ते चार किलोमीटपर्यंत वाहनांची रांग गेली. अपघातग्रस्त वाहने काढण्याचे कसोशीने प्रयत्न होत होते. वाहतूक कोंडी खूप वाढल्याने छोटय़ा खाडीपुलावरून हलकी वाहने वळवण्यात आली आहेत. अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्यासाठी क्रेन आणण्यात आली आहे, मात्र मालाने भरलेले असल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नांनी दोन्ही कंटेनर रस्त्यातून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक कोंडीतून सुटका झाली, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी दिली. दुसरा अपघात शीव-पनवेल महामार्गावरील खारघर कोपरानजीक दोन कंटेनरचा झाला. या अपघातानंतर कोपरा ते खारघर उड्डाणपुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघात एवढा भयानक होता की, एका गाडीचे पुढील दोन टायर फुटले. एका टँकरला कंटेनरने मागून जोरात दिलेल्या धडकेने अपघात झाला. अपघात ९ च्या सुमारास झाला. मात्र कंटेनर बाजूला करण्यासाठी हायवा मागवावा लागला होता. त्यामुळे सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनी कंटेनर बाजूला करण्यात आला व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला आहे.