शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील नाट्यगृहात एखाद्याा पक्षाचा मेळावा अथवा लोकप्रिय नाटकाचा प्रयोग असेल तर मुख्य रस्त्यावर प्रवास करणाºया प्रवाशांच्या मनात धडकी भरेल अशा पद्धतीचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून वारंवार दिसू लागले आहे. भावे नाट्यगृहातील वाहनतळ भरताच या ठिकाणी येणारे प्रेक्षक अथवा राजकीय पदाधिकारी आपली वाहने थेट शिवाजी चौक ते अग्निशमन केंद्रापर्यंतच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला उभी करत असल्याने मुख्य रस्त्यावर मोठी कोंडी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, नाट्यगृहास लागूनच महापालिकेची विभाग कार्यालयाची इमारत असून तेथे मात्र २५० ते ३०० वाहनांचे पार्किंग रिकामे राहात आहेत.

विष्णुदास भावे नाट्यगृह हे नवी मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असल्याने राजकीय पक्ष वातावरणनिर्मितीसाठी आणि मेळाव्यांसाठी या ठिकाणाचा वापर करताना दिसतात. छत्रपती शिवाजी चौकात झेंड्यांची आरास पक्षांकडून केली जाते. हा चौक सर्वाधिक वर्दळीचा असला तरी पोलिसांची देखरेख यामुळे वाहतूक सुरळीत असते. परंतु, भावे नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम असला की या चौकातून प्रवास करणे त्रासदायक ठरते.

आणखी वाचा-उरण – खारकोपर लोकलच्या कामांना वेग, मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांकडून कामाची पाहणी

भाजपच्या मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाट्यगृहात आयोजित मेळाव्यामुळे वाशीकर प्रवासी मेटाकुटीस आल्याचे दिसले. या ठिकाणी आलेल्या पदाधिकारी, नेत्यांच्या आलिशान वाहनांच्या रांगा नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. यातून बस थांबाही सुटला नाही. यामुळे भर गर्दीच्या वेळेत येथील रस्त्यावर मोठी कोंडी झाल्याचे चित्र होते. या कार्यक्रमामुळे विष्णुदास भावे नाट्यगृह ते जुहूगावपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. भावे नाट्यगृहाचे पार्किंग पूर्ण भरले असल्याने किमान पन्नास गाड्या थेट रस्त्याच्या कडेला नो पार्किंग क्षेत्रात उभ्या करण्यात आल्या होत्या. व्हीआयपी व्यक्तींच्या ही वाहने असल्याने वाहतूक पोलीसही याकडे ढुंकून पाहत नव्हते. यातून वाशी डेपोचा बस थांबाही सुटला नाही. बस थांब्यावर वाहनांचे पार्किंग केल्याने एनएमएमटी, बेस्ट, केडीएमटीच्या बसमध्ये प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी थांबावे लागत होते.

पोलिसांचे दुर्लक्ष

एखाद्याा राजकीय पक्षाचा मेळावा भावे नाट्यगृहात होत असेल तर तेथे येणाºया वाहनांमुळे नाट्यगृहातील वाहनतळ पुरेसे ठरणार नाही हे स्पष्टच आहे. असे असले तरी या नाट्यगृहास लागून वाहने उभी करण्यासाठी पुरेशी अशी व्यवस्था उपलब्ध आहे. नाट्यगृहाच्या मागील बाजूस महापालिकेने एक इमारत उभी केली असून त्यामध्ये सद्या:स्थितीत वाशी विभाग कार्यालयाचे कामकाज चालते. या ठिकाणी ३५० वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे. नाट्यगृहापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बंद नाल्यावर ३०० वाहने उभी करण्याची क्षमता असलेले वाहनतळ महापालिकेने तयार केले आहे. यापैकी सेंट लॉरेन्स शाळा ते शिवाजी चौक या पट्ट्यातील वाहनतळावर वाहने उभी केली जातात. मात्र नूर मशीद ते भाजी मंडईपर्यंतच्या भागातील वाहनतळ रिकामे असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय कार्यक्रमांच्या वेळी मोठया प्रमाणात चारचाकी वाहने येतात. भावे नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये जागा नसल्यास रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याचे निदर्शास आले आहे. यापुढे बेशिस्त पार्किंग खपवून घेतले जाणार नाही. सेक्टर १६ च्या नाल्यावरील पार्किंग किंवा अग्निशमन दल इमारतीतील पार्किंग हा त्याला पर्याय दिला जाईल. तशा सूचना वाशी विभागाला देण्यात येतील. वाहतूक कोंडी होऊ दिली जाणार नाही आणि बेशिस्त पार्किंग खपवून घेतली जाणार नाही. -तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग