उरण : लोकल मार्गावरील स्थानकांची उभारणी होऊन २२ -२३ महिने लोटले आहेत. मात्र या अल्प कालावधीतच उरण, द्रोणागिरी तसेच न्हावा शेवा आणि शेमटीखार येथील स्थानकांची दुरवस्था झाली आहे. येथील स्थानकांच्या भिंतीच्या लाद्या निखळू लागल्या आहेत. तर फलाट आणि पायऱ्या मध्ये भेगा पडल्या आहेत. फलाटावरील लाद्या ही उखडल्या आहेत. येथील उरण स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी येत असल्याने पाय घसरण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे स्थानका बाहेर बसविण्यात आलेले फेवर ब्लॉक ही सरकू लागले आहेत.
स्थानकांची ही दुरावस्था काही महिन्यातच झाली आहे. तुलनेने अगदी नगण्य प्रवासी सेवा असलेल्या या स्थानकांच्या या दुरावस्थे मुळे स्थानकांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उरण ते खाररकोपर ही लोकल सेवा सुरू झाली आहे. उरण ते बेलापूर / नेरुळ ही लोकल सेवा १९९७ ला जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी २०२४ हे वर्षे उगवावे लागले. १२ जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे. उशिरा का होईना उरण पर्यंत लोकल सेवा सुरू झाली. मात्र त्यानंतरच्या नागरिकांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
यात प्रामुख्याने दोन तासांच्या अंतराने असलेली लोकल, स्थानक परिसरातील स्वच्छता, महागडे पार्किंग,स्थानकांतील विजेचा खेळखंडोबा, उरण आणि द्रोणागिरी या दोन्ही स्थानकांच्या भुयारी मार्गात साचणारे पाणी या समस्या एकामागून एक समोर आल्या आहेत. त्यात नव्याने स्थानकांच्या दुररावस्थेची भर पडली आहे. द्रोणागिरी स्थानकांच्या भिंतीच्या मोठं मोठ्या लाद्या निखळून पडत आहेत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. उरण ते नेरुळ दरम्यानच्या उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा व शेमटीखार या चारही स्थानकांच्या फारशा निखळून पडल्या आहेत. जिन्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही फरशांना मोठं मोठ्या भेगा गेल्या आहेत. येथील फारशा ही उखडू लागल्या आहेत. त्यामुळे महिला तसेच जेष्ठ नागरीक चालतांना तोल जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी
उरण ते खारकोपर मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि शेमटीखार या स्थानकांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम आहे. कारण ही स्थानक सिडकोने उभारली आहेत. त्यानंतर ती मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र या स्थानकांच्या देखभाल दुरुस्ती कोणाची हा प्रश्न येथील सफाई कामाच्या वेळी ही समोर आला होता.
उदघाटना नंतर स्थानक रेल्वे कडे आहेत. मात्र स्थानकांची देखभाल आणि दुरुस्ती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे याची माहिती घेऊन कळवतो असे मत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे.