उरण : स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहातील आपल्या प्राणाचे बलिदान देणार्‍या हुतात्म्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक चिरनेर गावातील हुतात्मा स्मारकाचे आकर्षण असलेल्या सभागृहाच्या छताच्या सिलिंगची पडझड झाली असून, हुतात्मा स्मारकाची शोभा गेली आहे. त्यामुळे चिरनेर ग्रामस्थांबरोबर स्वातंत्र्य प्रेमी देशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला या संदर्भात लेखी निवेदन दिले असून, येत्या २५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणार्‍या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या आत हुतात्मा स्मारकाच्या छताच्या सिलिंगच्या झालेल्या पडझडीची दुरुस्ती संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने करावी. अशी मागणी लेखी निवेदनातून केली आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे जे उठाव झाले त्यात चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाचा आवर्जून समावेश करावा लागेल. ब्रिटिशांच्या विरोधात ज्या वीरांनी आपले हौतात्मे दिले. त्यात चिरनेरच्या जंगल सत्याग्रहातील सर्वच हुतात्म्यांचा सहभाग होता. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणार्‍या या वीरांना ही मातृ भूमी कधीच विसरणार नाही. येथील हुतात्म्यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्मारके आजही प्रेरणादायी आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीच्या कर्तव्यात कसूर होत असल्याचे दिसून येत असून, सार्वजनिक बांधकाम खात्याला या हुतात्मा स्मारकाच्या सभागृहाच्या छताची झालेली पडझड दिसली नाही का? असा सवालही नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान चिरनेर गावात गणपतीच्या देवळाजवळ आज अस्तित्वात असलेले हे दगडी स्मारक सर्वांना प्रेरणा देणारे ठरले आहे. गेली कित्येक वर्ष २५ सप्टेंबरच्या दिवशी या हुतात्मा स्मारकाला शासकीय मानवंदना दिली जाते. हे स्मारक म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा स्मृति स्तंभ दंडगोलाकार आहे. त्याच्या कळसावर ज्योत दिसून येते. चारी बाजूला वंदे मातरम च्या पाट्यांमध्ये प्रत्येकी तीन नावे असून, त्यांची संख्या १२ आहे. मामलेदारांसह सरकारी पाच लोक आणि जनतेपैकी सात जणांची नावे होती. शासनाच्या वतीने वंदे मातरमची एक पाटी कमी करून, हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचे नाव २३ जानेवारी २००२ रोजी स्तंभावर आले आहे. त्यामुळे स्मृति स्तंभावरील नावे आता १३ दिसून येत आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी हुतात्मे स्मारके उभारली आहेत. त्यापैकी चिरनेर येथे साधारण एक चौरस फुटाच्या क्षेत्रावर हे स्मारक उभारले गेले आहे. या स्मारकाच्या दर्शनी भागात २५ फूट उंचीचा स्तंभ बांधला गेला आहे. या स्तंभाच्या टोकावर स्मारकाचे बोधचिन्ह म्हणून मशाल दिसून येते. स्मारकामध्ये असलेले सभागृह हे स्मारकाचे आकर्षण आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या या वीरांना ही मातृभूमी कधीच विसरणार नाही. येथील हुतात्म्यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्मारके आजही प्रेरणादायी असून, देशभक्तीची प्रेरणा देत आहेत.

राष्ट्र हितास्तव आणि समाज रक्षणास्तव ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या जंगल सत्याग्रहात हाती तिरंगा घेऊन प्राणाचे बलिदान देऊन, ज्यांनी धाडसाने जनजागृती केली त्या शूर देश भक्तांच्या नावाने उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची अशी दुरावस्था नजरेत पाहणे हे मोठे दु:ख आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन २५ सप्टेंबर रोजी साजरा होणार्‍या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या आत छताची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.