उरण : जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या जेएनपीए ते पळस्पे व आम्र मार्ग या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांसह सेवा मार्गांवरही अवजड वाहनांचे बेकायदा वाहनतळ निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील जीवघेणी वाहनतळे कधी दूर होणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

उरण सामाजिक संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने २३ मार्च २०१८ च्या आदेशात महामार्गाच्या कडेला ट्रक (कंटेनर ट्रेलर) उभे केले जाणार नाहीत याकरिता जेएनपीए खात्रीशीर उपाययोजना करेल असे स्पष्ट केले होते. त्याचे काय झाले असा सवाल सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते प्रमोद ठाकूर यांनी केला आहे.

जेएनपीए बंदरातील आयात-निर्यात मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळे उभारण्यात आली आहेत. त्याचा वापर न करता ही वाहने जेएनपीए बंदर परिसरात व मार्गांवर वाहने उभी केली जात आहेत. तसेच उरणच्या ग्रामीण भागात मालाची साठवणूक करण्यासाठी शेकडो कंटेनर यार्ड बेकायदा उभारण्यात आले असून येथे येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने ती वाहनेही विविध मार्गांवर उभी केली जात आहेत. यामुळे जेएनपीएसह उरणच्या ग्रामीण भागातही वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांना वेळेत घरी पोहोचता येत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान या संदर्भात जेएनपीए बंदराचे सार्वजनिक वाहतूक विभागाचे अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अपघातांच्या घटना

अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांत अनेक दुचाकीस्वारांनी आपला जीव गमावला आहे. जेएनपीए बंदराला जोडणारे जेएनपीए ते पळस्पे व जेएनपीए ते नवी मुंबई असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व हलकी वाहने ये-जा करीत असतात. अनेकदा जड व अधिक लांबीच्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात मार्गावर होत आहेत. या संदर्भात उरणच्या आमसभेत हा मुद्दा मांडला गेला. याची दखल घेत येथील बेकायदा वाहनतळ आणि त्यामुळे होणारे अपघात या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील जड कंटेनर वाहनांवर कारवाई करून त्या दूर केल्या जातील त्यासाठी उपाययोजना केली जाईल. – तिरुपती काकडे, पोलीस उपआयुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग