उरण : गुरुवार पासून श्रावणी सोमवार सुरू होत आहेत. त्यामुळे उरण पनवेल या राष्ट्रीय महामार्गात असलेल्या जासई शंकर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मंदिराचे लवकरात लवकर मार्गातून स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून केली जात आहे. २०१८ मध्ये जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले.
या महार्गात जासई हद्दीतील शंकर मंदीरही आहे. या मार्गावर जासई नाका ते शंकर मंदीर असा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाच्या नवी मुंबई व पनवेल कडे जाणाऱ्या मार्गिकेत हे मंदीर येत आहे. त्यामुळे या मंदिराच्या विस्थापनाचा मुद्दा आला आहे. त्यासाठी जेएनपीए प्रशासन,एन एच आय व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात चर्चा ही झाली मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. जासई उड्डाणपुलावरील शंकर मंदिरामुळे उरणकडून जाणाऱ्या पनवेल मार्गावरील एका मार्गिकचे काम रखडले आहे.
यातील अर्ध्या मार्गिकचे काम पूर्ण करून पुलाची दुसरी मार्गिका ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपूलाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्या आहेत. मात्र उरण कडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा न मिळाल्याने उड्डाणपुलावरून उतरणारी एक मार्गिका रखडली आहे. जो पर्यंत जेएनपीए प्रशासन शंकर मंदिराला मंजूर करण्यात आलेली २५ गुंठे जमीन जागेचा अधिकृत पणे पताब्यात देऊन मंदिराची पिंड स्थापित करणार नाही,तो पर्यंत मंदिराला हात लावून देणार नाही तसेच प्रत्यक्ष काम सुरू करा केवळ तोंडी आश्वासन नको अशी स्पष्ट भूमिका जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी घेतली आहे.
या पुलावरील एकच मार्गिका सुरू असल्याने नवी मुंबई आणि पनवेल कडून येणारी तसेच उरण कडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये जा करीत असतांना वाहनांना शंकर मंदीर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्यात आता पुलाला खड्डे पडल्याने भर पडली आहे. तर नवी मुंबई आणि पनवेल कडून येणारी तसेच उरण कडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये जा करीत असतांना वाहनांना शंकर मंदीर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वर्षे भरापूर्वी जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेल कडे जाणारी पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते नवी मुंबई व पनवेल या मार्गाने खाजगी व सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. त्याचप्रमाणे जासई नाक्यावर वाहतूक कोंडी ही दूर झाली आहे. मात्र जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये जा होत आहे.
दहा किलोमीटर पेक्षा अधिकचे अंतर कमी झाले
जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी करळ उड्डाणपूल ते धुतुम मार्गे गव्हाण फाटा या मार्गाने प्रवास करावा लागत होता. हे जवळपास दहा किलोमीटरचे अंतर कमी झाले असून करळ जासई मार्गे नंतर थेट गव्हाण फाटा काही मिनिटात हे अंतर कापत येत आहे.
श्रावणी सोमवारमुळे मंदीरातील गर्दीत वाढ
उरण- पनवेल मुख्य मार्गावर असलेल्या या मंदिरात श्रावणी सोमवारमुळे गर्दी होऊ लागली असून याची सुरुवात सोमवारी झाली आहे. वाढत्या गर्दीमुळे भविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जेएनपीए प्रशासनाने लवकरात लवकर नवीन मंदिर उभारण्याचा मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे.