उरण : शहरातील उरण मोरा मार्गावर उरण नगर परिषेदेने पेन्शनर्स पार्कचा फलक बसविला आहे. मात्र पार्कसाठी उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे येथील पेन्शनर्स पार्क हे केवळ फलकापुरते उरले आहे. या पार्कात ज्येष्ठ नागरिकांना बसायला एकही आसन व्यवस्था नाही. यामुळे ज्येष्ठांची मोठी कुचंबना होत असल्याने या पार्ककडे पाठ फिरवली आहे.

शहरात ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनर्सची संख्या वाढली आहे. सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक व्यायाम करण्यासाठी पार्क, बागेत फिरण्यासाठी येतात. येथे ज्येष्ठांना विश्रांती घेण्यासाठी किमान बाकड्याची व्यवस्था असावी अशी अपेक्षा आहे. उरणच्या या पेन्शनर्स पार्कमधून अनेक उपक्रम राबवले जातात. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विमला तलाव या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधांचा वापर केला जात आहे. येथे खास ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनर्स पार्क घोषित करण्यात आले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचे मत उरणमधील ज्येष्ठ नागरिक अशोक म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

उरण नगर परिषदेने पेन्शनर्स पार्क प्रस्तावित केले आहे. मात्र भूखंड हस्तांतरण झालेले नाही. लवकरच हे काम पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.- निखिल दोरे, अभियंता, उरण नगर परिषद