उरण : जासई उड्डाणपूलाची मुख्य व सेवा मार्गाची मार्गिका येथील मार्गात येणाऱ्या शंकर मंदीरामुळे रखडली आहे. यामुळे या मार्गावरील अपघाताचा धोका वाढला आहे.उरण पनवेल या राष्ट्रीय महामार्गात असलेल्या जासई शंकर मंदिरात या मंदिराचे लवकरात लवकर मार्गातून स्थलांतर करण्याची मागणी प्रवासी,वाहन चालक व ग्रामस्थ आणि भाविकांकडून केली जात आहे. २०१८ मध्ये जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या महार्गात जासई हद्दीतील शंकर मंदीर ही आला आहे. या मार्गावर जासई नाका ते शंकर मंदीर असा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाच्या नवी मुंबई व पनवेल कडे जाणाऱ्या मार्गिकेत हे मंदीर येत आहे. त्यामुळे या मंदिराच्या स्थलांतराचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी जेएनपीए प्रशासन,एन एच आय व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात चर्चा ही झाली मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.
जासई उड्डाणपुलावरील शंकर मंदिरामुळे उरणकडून जाणाऱ्या पनवेल मार्गावरील एका मार्गिकचे काम रखडले आहे. मात्र उरण कडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा व मंदिर उभारणीसाठी निधी न मिळाल्याने उड्डाणपुलावरून उतरणारी एक मार्गिका व सेवा मार्गाची मार्गिका रखडली आहे. यामुळे उरणच्या दिशेने पनवेल कडे जाणाऱ्या मार्गावरून कंटेनर, प्रवासी व हलकी वाहने यांना उड्डाणपुला खालून तसेच मुख्य मार्गिका ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या पुलावर यापूर्वी अपघात झाल्याने तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मंदिराच्या भूखंडाचा प्रश्न सुटला : जासई शंकर मंदीराच्या भूखंडाचा प्रश्न सुटला असून या भूखंडाचा ताबा घेऊन भराव ही सुरू करण्यात आला आहे. मात्र मंदीरासाठी लागणारा ३ कोटींचा निधी मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नसल्याची माहीती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे. या पुलावरील एकच मार्गिका सुरू असल्याने नवी मुंबई आणि पनवेल कडून येणारी तसेच उरण कडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये जा करीत असतांना वाहनांना शंकर मंदीर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्यात आता पुलाला खड्डे पडल्याने भर पडली आहे.
वर्षे भरापूर्वी जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेल कडे जाणारी पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते नवी मुंबई व पनवेल या मार्गाने खाजगी व सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. त्याचप्रमाणे जासई नाक्यावर वाहतूक कोंडी ही दूर झाली आहे. मात्र जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये जा होत आहे. शंकर मंदीर स्थलांतर हे निधीची अधिक मागणी होत असल्याने रखडले असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन एच आय)चे विभागीय अभियंता धीरज शहा यांनी दिली आहे. तर जेएनपीचे सार्वजनिक विभागाचे प्रमुख वैद्यनाथन यांच्याशी संपर्क साधला असता स्थलांतराच्या बाबतीत जेएनपीएची कोणतीही भूमिका नाही. आवश्यक अद्ययावत माहिती कृपया सिडको कडून माहीती घ्यावी. असे लेखी कळवले आहे. या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना लेखी संदेश देऊनही त्यांच्या कडून प्रतिसाद नव्हता.