१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे हाल; पहाटेपासून रांगा

नवी मुंबई : लस मिळत नसल्याने आता नागरिकांच्या तीव्र भावना उमटू लागल्या आहेत. नवी मुंबईत तर ३ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिली मात्रा मिळालेली नाही. त्यामुळे आज ना उद्या लस मिळेल या आशेवर लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून रांगा लावल्या जात आहेत. पावसची तमा न बाळगता नागरिक भिजत रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाकडून उपलब्ध लस पुरवठय़ानुसार पालिका दररोज नियोजन करीत आहे. मात्र अल्प प्रमाणात लस मिळत असल्याने ती एका दिवसात संपत आहे. त्यामुळे गेली काही दिवस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दुसरी मात्रा देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पहिली मात्रा मिळतच नाही.त्यामुळे प्रतीक्षा केल्यानंतर अखेर नागरिक खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयांत मात्र लस मिळत आहे.

१ मे नंतर देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लगेच ३ जूननंतर सातत्याने लसतुटवडा आहे. जून महिन्यात महापालिकेला फक्त तीन  दिवस या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करता आले. तेव्हापासून या वयोगटोतील नागरिक पहिल्या मात्रेसाठी प्रतीक्षेत आहेत. केंद्रांवर जाऊनही लस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

नवी मुंबई महापालिकेने जास्ती जास्त नागरिकांची लसीकरण करण्यासाठी शंभरहून अधिक केंद्रांचे नियोजन केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या तीन रुग्णालयांत व काही आरोग्य केंद्रांतच हे लसीकरण सुरू आहे. महापालिकेने दिवसाला १५ हजार जणांना लस दिल्याचे उदाहरण आहे. मात्र लसच उपलब्ध होत नसल्याने करायचे काय हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. फक्त दिवसाला १ हजारांपर्यंत नागरिकांनाच पालिका लस देत असल्याने लसीकरण मोहिम विस्कळीत झाली आहे.

आतापर्यंत शहरातील लसीकरणासाठी पात्र ११ लाख नागरिकांपैकी  ८,३८,१४७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिली मात्रा ६,४७,९४२ जणांना तर दुसरी मात्रा १,९०,२०५ जणांना देण्यात आली आहे.

शहरात लस मिळत नसल्याने पालिकेची केंद्रे कित्येक दिवस बंद आहेत. मात्र खाजगी रुग्णालयांत १८ ते ४४ वयोगटातील पहिल्या मात्रेचे दिवसाला ३ हजार नागरिकांचे लसीकरण होते.

आजही फक्त दुसरी मात्राच

लस तुटवडय़ामुळे बुधवारीही दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यात येणार आहे. शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशील्डची दुसरी मात्रा पालिकेच्या नेरुळ रुग्णालयात तर कोवॅक्सिनची दुसरी मात्रा नेरुळ, वाशी, ऐरोली रुग्णालयात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सागितले.

शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १ मे पासून सुरू करण्यात आले होते. ३ जूनला या वयोगटातील ६७ जणांचे लसीकरण केले त्यानंतर सतत लसींचा तुटवडा होत असून या वयोगटासाठी पहिल्या मात्रेसाठी लसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरण होत नाही. खाजगी रुग्णालयांना मात्र लस मिळत असल्याने त्यांच्याकडे या वयोगटातील पहिल्या मात्रेचे लसीकरण होत आहे.

-रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका