लोकसत्ता टीम

नवी मुंबई: शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी म्हणून राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी सोमवार १३ मार्च पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यात शिधावाटप कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतल्याने नवी मुंबईतील वाशी शिधावाटप कार्यालय बंद असून असून याचा धान्य वितरण प्रणाली वर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. तसेच आनंदाच्या शिधावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- द्राक्षांची आवक वाढल्याने दरात घरसण

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अशा लाभार्थी शिधापत्रिका धारकांना दोन रुपये गहू व तीन रू किलो तांदूळ असे स्वस्त धान्य दीले जाते. वाशी शिधावाटप दुकानांतर्गत ४८ हजार लाभार्थी आहेत. गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेशन दुकानात १०० रुपयांत चार वस्तूंचं शिधा जिन्नस देण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाने घेतला आहे. यात सणानिमित्त आवश्यक अशा रवा,साखर,चणाडाळ व पामतेल अशा चार महत्त्वाच्या प्रत्येकी एक किलो जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा सरकारनं घेतला आहे. मात्र शिधावाटप कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली असून अजून पर्यंत या जिन्नस रेशन दुकानात पोहोचल्या नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हा संप मिटला नाही तर लाभार्थी कुटुंबाचा आनंदाचा पाडवा कडू ठरण्याची शक्यता आहे.