नवी मुंबई : ठाणे पनवेल महामार्गावर घणसोली येथे एका २५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्या चार तारखेला झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुजितकुमार रामसजिवन बिंद्र असे यातील मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली स्टेशन नजीक असलेल्या एका हॉटेल पुढे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडीत आढळून आला आहे. त्याच्या कडे आढळून आलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली असून तो डम्पिंग रस्ता मुलुंड येथे राहतो तर मूळ उत्तरप्रदेश येथील प्रतापगढ येथील रहिवासी आहे. आणखी वाचा-नवी मुंबई : ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन दिवसांत सोनसाखळीचा शोध त्याच्याकडील कागपत्रात आढळलेल्या पत्त्यावर पाहणी केली असता त्याचा मोठा भाऊ पवनकुमार हा आढळून आला. त्याला याबाबत माहिती दिल्यावर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. . याबाबत तपास सुरु असून हत्या का करण्यात आली तसेच कोणी केली याचा शोध सुरु आहे. अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिली.