फुलपाखरांची विभागणी एकंदरीत सहा कुळांमध्ये होते. त्यांचा आकार, रंग, पंखांची ठेवण याला अनुसरून हे वर्गीकरण असते.

निम्फालिडी : या कुळातील फुलपाखरे ही मोठय़ा आकाराची असून, त्यांच्या पुढच्या दोन पायांवर दाट केस असतात; म्हणूनच मराठीत त्यांना ‘कुंचलपाद कुळ’ असे म्हणतात. या कुळामधील फुलपाखरांमध्ये खूप विविधता असते, यातली काही ठरावीक फुलपाखरे ही कधीच फुलांवर येत नाहीत.

हेस्पेरायडी : या कुळातील फुलपाखरे ही वेगाने उडणारी, अत्यंत चपळ असतात; म्हणून याचे नामकरण ‘चपळ कुळ’ असे करण्यात आलेले आहे. यांना फारसे सौंदर्य नसते. यातली बहुसंख्य फुलपाखरे ही क्वचितच पंख उघडतात, तर काही फुलपाखरे मात्र सदैव पंख उघडूनच बसतात.

लायसीनिडी : या कुळामध्ये फुलपाखरांचे आकार लहान असतात व पंख उघडल्यावर आतला रंग निळसर असतो; म्हणून यांना मराठीत ‘नील कुळा’तील फुलपाखरे असे म्हणतात. अत्यंत नाजूक, सुंदर आणि प्रामुख्याने जंगलांमध्ये या प्रकारची फुलपाखरे आढळतात. अपवादात्मक फुलपाखरे लाल रंगाचीदेखील असतात.

पीएअरिडी : पांढऱ्या व पिवळ्या रंगाची मध्यम आकाराची ही फुलपाखरे सर्वाचे लक्ष वेधून घेतात. गटागटाने एकाच ठिकाणी ही फुलपाखरे वावरतात. पिवळा व पांढरा रंग यामुळे ‘पीत-श्वेत कुळ’ असे त्यांना संबोधले जाते.

पॅपिलिओनिडी : ही फुलपाखरे मोठय़ा आकाराची असून त्यांना शेपटीसारखे पंख लाभलेले असतात; म्हणून याचे नामकरण ‘पुच्छ कुळ’ असे करण्यात आले. या प्रजातीतील फुलपाखरांच्या अळ्यांमध्ये ऑस्मेटेरियमचा अंतर्भाव असतो. आकाराने मोठी, अत्यंत सुंदर रंगसंगती लाभलेली ही फुलपाखरे म्हणजे फुलपाखरांच्या सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण! महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, त्याचप्रमाणे केरळ, कर्नाटक, उत्तराखंड यांची राज्य फुलपाखरेही याच कुळातली आहेत.

रिओडिनिडी : या कुळातल्या फुलपाखरांची संख्या अत्यंत कमी आहे. अर्धवट पंख उघडून बसण्याची यांची सवय असते. जंगलांमध्ये ही फुलपाखरे आढळतात. यांना ‘मुग्धपंखी कुळा’तली फुलपाखरे म्हणून ओळखले जाते.

भारतात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या सुमारे १,३२० प्रजातींपैकी ‘सदर्न बर्डविंग’ (१९० मिमी) हे सर्वात मोठे फुलपाखरू असून, सर्वात लहान ‘ग्रास ज्वेल’ (१७ मिमी) आहे. १५ दिवस ते ३ महिने एवढाच जीवनकाळ लाभणारी फुलपाखरे स्वछंदानंदाचे प्रतीकच जणू!

(या प्रजातींची नावे लॅटिनवर आधारित असून त्यांची इंग्रजी स्पेलिंग अनुक्रमे Nymphalidae, Hesperiidae, Lycaenidae, Pieridae, Papilionidae, Riodinidae अशी आहेत)

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org