07 July 2020

News Flash

मनोवेध : निद्रानाश

झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले तर झोप येऊ शकते. हे शक्य होण्यासाठी साक्षीभावाचा सराव उपयुक्त ठरतो.

संग्रहित छायाचित्र

– डॉ. यश वेलणकर

निद्रानाश या आजाराची दोन प्रकारची लक्षणे असतात. काही जणांना झोप लागत नाही; तर काहींना झोप लागते, पण ती सलग लागत नाही-सतत जाग येत राहते. झोप पुरेशी न झाल्याने थकवा, निरुत्साह जाणवत राहतो. तारुण्यात निद्रानाशाचे महत्त्वाचे कारण शारीरिक किंवा मानसिक वेदना हे असते. झोप लागत नाही याचीच चिंता वाटू लागते. झोप येण्यासाठी मनोमन बरेच प्रयत्न केले जातात, पण अशा प्रयत्नांनी झोप येत नाही. कारण विचार मनाला उत्तेजित ठेवतात. मन उत्तेजित असेल तर झोप येत नाही. अशावेळी प्रयत्न शैथिल्य आवश्यक असते. योगात प्रयत्न शैथिल्यात ‘अनंत समापत्ती’ असे सूत्र आहे. ते झोपेविषयीही खरे आहे.

झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले तर झोप येऊ शकते. हे शक्य होण्यासाठी साक्षीभावाचा सराव उपयुक्त ठरतो. झोप लागत नाही हीच चिंता किंवा अन्य कोणतीही चिंता या सरावाने कमी होते. त्यासाठी मनात चिंता आहे हे मान्य करायचे आणि लक्ष शरीरावर नेऊन संवेदना जाणायच्या, स्वीकारायच्या. त्यामुळे चिंता निर्माण करणारे विचार कमी होऊ लागतात. झोप लागेपर्यंत अशा संवेदना किंवा पोटाची श्वासामुळे होणारी हालचाल जाणत राहिली, तर नकळत निद्रादेवी प्रसन्न होते. ती झाली नाही तरी मनाला विश्रांती मिळत असल्याने झोप न मिळाल्याने होणारा त्रास कमी होतो. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास प्रखर प्रकाश बंद करणे, टीव्ही/मोबाइल पाहणे बंद करणे आवश्यक असते. कारण झोप येण्यासाठी आवश्यक रसायने डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडत असेल तर तयार होत नाहीत. झोपायला जाण्यापूर्वी कोणतेही वादविवाद करायचे नाहीत अन्यथा तेच विचार मनाचा ताबा घेतात.

अष्टांग योगात धारणा, ध्यान याआधीची पायरी प्रत्याहार आहे. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास हिचा अवलंब करायचा, म्हणजे ज्ञानेंद्रियांना कोणताही आहार द्यायचा नाही. काहीही पाहायचे नाही, ऐकायचे नाही, व्यायाम करायचा नाही. लक्ष श्वासावर, शरीरावर आणायचे. आज झोप लागेल की नाही-या मनात येणाऱ्या विचारालाही महत्त्व द्यायचे नाही. चिंता, तणाव कमी झाला की झोप लागतेच. ती लागत नसेल तर शरीराला झोपेची गरज नाही असे समजून त्याचाही स्वीकार करायचा. वार्धक्यात झोपेची वेळ निसर्गत: कमी होते. अशा वेळी मिळणाऱ्या काळाचे काय करायचे, हा प्रश्न असतो. झोपेची आसक्ती न ठेवता या वेळी करता येतील असे सर्जनशील उपक्रम शोधणे हेच यावरचे उत्तर आहे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:07 am

Web Title: article on insomnia abn 97
Next Stories
1 कुतूहल : वाळवंटातले जहाज
2 मनोवेध : झोप आणि त्रिगुण
3 कुतूहल : ग्रामीण पर्यावरण शाळा
Just Now!
X