29 March 2020

News Flash

मनोवेध : शरीराची युद्धस्थिती

कोणताही धोका जाणवला, मोठ्ठा आवाज झाला, की शरीरात अ‍ॅड्रिनालीन रसायन पाझरते

 डॉ. यश वेलणकर

भीती वाटली की छातीत धडधड होते, हे प्रत्येकाने अनुभवलेले असते. अ‍ॅड्रिनालीन रसायनामुळे हृदयाची गती वाढते, त्यामुळे अशी धडकन जाणवते. शरीरातील या सर्व बदलांचे नियंत्रण मेंदूत आहे हे आता स्पष्ट झाले असले, तरी पूर्वी विचार आणि शरीरातील बदल या दोन वेगवेगळ्या घटना आहेत असे शास्त्रज्ञांना वाटत होते. शरीरातील हे बदल आपण जागृत मनाच्या विचारांनी नियंत्रित करू शकत नाही, त्यामुळे हे नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेला स्वयंचलित- ‘ऑटोनोमिक नव्‍‌र्हस सिस्टीम’ असा शब्द लांग्ले यांनी १९०३ मध्ये सर्वात प्रथम वापरला, जो अजूनही रूढ आहे.

या व्यवस्थेमुळे, कोणताही धोका जाणवला की शरीरात काही बदल होतात आणि शरीर युद्धस्थितीत जाते. या स्थितीत मनात भीती वा राग या भावना असतात. युद्धस्थिती नसते त्या वेळी शरीरात शांतता स्थिती असते. आपल्या शरीरमनाच्या युद्ध आणि शांतता या स्थिती परिस्थितीनुसार बदलत असतात.

कोणताही धोका जाणवला, मोठ्ठा आवाज झाला, की शरीरात अ‍ॅड्रिनालीन रसायन पाझरते. त्यामुळे धोक्यापासून बचाव करण्यासाठी शरीर तयार होते. त्यासाठी स्नायूंना अधिक ऊर्जा आवश्यक असते. ऊर्जा साखर आणि प्राणवायू यांच्यापासून तयार होते. त्यासाठी श्वासगती आणि रक्तातील साखर वाढते. पचनसंस्थेकडील रक्तपुरवठा कमी होऊन मोठय़ा स्नायूंना अधिक रक्त पुरवले जाते. ते वेगाने जावे म्हणून हृदयगती, रक्तावरील दाब वाढतो. हे सारे बदल झाल्याने स्नायूंना अधिक ऊर्जा मिळते आणि प्राणी लढून किंवा पळून स्वत:चे संरक्षण करतो.

अशी युद्धस्थिती संकटातून सुटका होण्यासाठी आवश्यक आहे. माणसाप्रमाणे अन्य प्राण्यांतही ती असते. मात्र अन्य प्राणी सतत क्षणस्थ असतात. ती घटना संपली, की त्यांच्या शरीरात पुन्हा शांतता स्थिती निर्माण होते. ते भविष्यातील संभाव्य संकटांचा अमूर्त विचार करू शकत नाहीत. माणसाच्या मनात मात्र असे विचार येतात. त्या प्रत्येक वेळी युद्धस्थिती निर्माण होते आणि त्यामुळेच अनेक शारीरिक आजार होतात. आपल्या शरीराला होणारे ७० टक्के आजार हे युद्धस्थितीत राहिल्याने होतात. अन्य प्राण्यांत हायपरटेन्शन, मधुमेह अशा आजारांचे प्रमाण माणसाच्या तुलनेत खूप कमी आहे. माणूस भूतकाळातील स्मृती व भविष्याच्या चिंता यांमुळे सतत युद्धस्थितीत राहू लागला, की अशा अनेक तणावजन्य आजारांना बळी पडतो.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 12:10 am

Web Title: article on state of warfare of the body abn 97
Next Stories
1 कुतूहल : बीजगोळे
2 मनोवेध : स्वयंसूचना
3 कुतूहल : पर्यावरण चळवळीचा पाया
Just Now!
X