News Flash

कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- कांडी भरण्याची यंत्रे

कांडी गुंडाळायची यंत्रे वेगवेगळ्या प्रकारची असतात. साध्या यंत्रांपासून ते स्वयंचलित यंत्रांपर्यंत अनेक प्रकार वापरले जातात.

| July 22, 2015 05:16 am

कांडी गुंडाळायची यंत्रे वेगवेगळ्या प्रकारची असतात. साध्या यंत्रांपासून ते स्वयंचलित यंत्रांपर्यंत अनेक प्रकार वापरले जातात. साध्या यंत्रावर साधारणपणे ३० ते ३५ चात्या असतात. या सर्व चात्या एका पट्टय़ाद्वारे एकदम फिरवल्या जातात किंवा चालवल्या जातात. या चात्यावर कांडी अडकवली जाते आणि सूत कांडीवर भरले जाते. या यंत्राचे उत्पादन मर्यादित असते. कारण या यंत्रांमध्ये चात्यांवर कांडी बसवणे, सूत कांडीवर गुंडाळून यंत्र सुरू करणे, कांडी भरल्यावर यंत्र बंद करणे, भरलेल्या कांडय़ा बाहेर काढणे व नवीन रिकाम्या कांडय़ा लावून पुन्हा यंत्र सुरू करणे, या सर्व क्रिया यंत्रचालकास हाताने कराव्या लागतात.
अर्धस्वयंचलित यंत्रामध्ये वर उल्लेख केलेल्यापकी काही कामे यांत्रिक रचनेद्वारे आपोआप होतात. त्यामुळे एक यंत्रचालक एकापेक्षा अधिक यंत्रे चालवू शकतो, त्यामुळे एका यंत्रचालकामागे कांडय़ा तयार करण्याचे काम जास्त होते. या यंत्राचा वेगही साध्या यंत्रापेक्षा जास्त असतो आणि म्हणूनही उत्पादन वाढते.
यांत्रिकीकरणाचा पुढचा टप्पा म्हणजे संपूर्ण स्वयंचलित यंत्र. यंत्रचालकाने साधे यंत्र चालवताना जी कामे हाताने करावयाची असतात, ती बहुतेक सारी कामे या यंत्राद्वारे केली जातात. रिकाम्या कांडय़ा आणणे व योग्य ठिकाणी यंत्रावर ठेवणे, सुताने भरलेले कोन आणून यंत्रावर योग्य जागी लावणे एवढीच कामे चालकास करावी लागतात. या यंत्राचा वेग अर्धस्वयंचलित यंत्रापेक्षा जास्त असतो. त्यामुळे या यंत्रावर जास्त उत्पादन होते. म्हणजेच ठरावीक वेळात जास्त कांडय़ा तयार होतात. त्यामुळे एक कामगार/ यंत्रचालक ‘अधिक यंत्रावर’ काम करू शकतो. या यंत्रावर सूत तुटले तर ते जोडण्याचे काम मात्र यंत्रचालकास हाताने करावे लागते. तुटलेल्या सुताची चाती आपोआप बंद पडते. यंत्रचालकाने सूत जोडल्यावर पुन्हा चालू होते. या यंत्रावर कमीत कमी ७२ चात्या असतात. याखेरीज या यंत्रावर वेगवेगळ्या सुतांकाचे सूत एकाच वेळी कांडीवर गुंडाळता येऊ शकते. ही सोय आधीच्या वर्णन केलेल्या यंत्रात नाही. विणकामाद्वारे तयार होणारे कापड चांगले आणि विनाअडथळा तयार व्हायला हवे असेल तर पूर्वतयारीच्या या सर्व पायऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या लागतात.
महेश रोकडे (कोल्हापूर)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – हे थाटाचे लग्न कुणाचे..?
जुनागढ संस्थानचा शेवटचा नवाब मुहम्मद महाबत खानजी तृतीय याची कारकीर्द इ.स. १९११ ते १९४७ अशी झाली. इतर अनेक संस्थानिकांप्रमाणे महाबत खान त्याचे विलासी जीवन, उधळपट्टी याबद्दल चच्रेत होताच परंतु त्याच्या अजब प्राणीप्रेमामुळेही तो विख्यात झाला.
विशेषत विविध जातीच्या कुत्रे पाळण्याचे त्याचे वेड चकीत करणारे होते. देशी विदेशी जातींचे त्यांनी ३०० कुत्रे पाळले होते आणि या सर्वाची जोपासना आपल्या कुटुंबातील व्यक्ती असल्याप्रमाणे तो करीत असे. या कुत्र्यांच्या देखभालीसाठी अनेक सेवक आणि डॉक्टर्सची त्यांनी नियुक्ती केली होती. त्यांचे कपडे शिवण्यासाठी विशेष िशपी नियुक्त होता. या सर्व श्वानपरिवारापकी रोशनआरा ही कुत्री त्यांची विशेष आवडती होती.
रोशनआरा वयात आल्यावर तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी दिवाण अल्लाबक्षवर सोपविली गेली. मंगरूळच्या नवाबाचा गोल्डन र्रिटायव्हर जातीचा युवा श्वान बॉबीची वर म्हणून दोन्ही बाजूंनी पसंती झाली. विवाहाचा दिवस ठरल्यावर लग्नसमारंभासाठी इतर संस्थानिक, राजघराण्यातील व्यक्ती, सरदार आणि खुद्द व्हाइसरॉय यांना आमंत्रणे गेली. रोशनआरा आणि बॉबीच्या मित्र मत्रिणी कुत्र्यांनाही आमंत्रणे होती. अशा २५० मित्र मत्रिणींबरोबर नवाबाचा ३०० श्वानांचा परिवार मिळून साडेपाचशे श्वान वऱ्हाडी सजून लग्नाला आले. इतर दरबारी, निमंत्रित राजे हे दोनशेच्या घरात उपस्थित होते. वर श्वान बॉबीचे जुनागढ रेल्वेस्टेशनवर आगमन होताच बँड पथकाने धून वाजवून स्वागत केले, सन्याने गार्ड ऑफ ऑनर देऊन बॉबीला विवाहस्थळी आणण्यात आले. ठरल्यावेळी रोशन आरा-बॉबी विवाह संपन्न होऊन मोठय़ा शाही मेजवानीचा बेत झाला व वऱ्हाडाची पांगापांग झाली.
निमंत्रितांपकी फक्त व्हाइसरॉय लग्नास उपस्थित नव्हते. प्राण्यांच्या लग्नाच्या नाटकावर अनाठायी खर्च करणे त्यांना आवडले नाही. या श्वान विवाहापायी (त्या वेळी) एकंदर तीन लाख वीस हजार रु. खर्च झाला!
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2015 5:16 am

Web Title: candy vending machines
टॅग : Navneet
Next Stories
1 कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- बाण्यासाठी
2 जुनागढ राज्य स्थापना
3 स्वयंचलित वाइंडिंग मशीन
Just Now!
X