महाराष्ट्रातील सोळा जिल्हे यंदा दुष्काळाने होरपळत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. भविष्यातील पाण्याच्या संकटाचा अंदाज बांधून काही शेतकऱ्यांनी मात्र नियोजन करून ठेवले. माळीनगर (जि. सोलापूर) येथील कृषिभूषण सुरेश वाघधरे हे त्यातलेच एक. सोलापूर जिल्हा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण झाला असताना सुरेश वाघधरे यांची शेती आणि पाच लाख कलमी रोपे असलेली रोपवाटिका हिरवीगार आहे. यामागे वाघधरे यांची तपश्चर्या आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यातील वाघधरे यांच्या घरची परिस्थिती फार बरी नव्हती. बी.कॉम.चे शिक्षण घेता घेता कधी दुसऱ्यांच्या शेतात, तर कधी कारखान्यात काम करून सुरेशरावांनी कुटुंबाला हातभार लावला. पुढे रीतसर नोकरीत मुख्य लेखाधिकारी पदापर्यंत प्रवास झाला. आई केशरबाई शेती करण्यासाठी सतत प्रेरणा देत होती. नोकरीत असतानाच एकरी दोन हजार याप्रमाणे त्यांनी २० एकर पडीक जमीन विकत घेतली. काही काळाने पूर्णवेळ शेती करण्यासाठी नोकरी सोडली. ‘हा निर्णय आतबट्टय़ाचा आहे’, असे काहींनी हिणवले.  वाघधरे यांनी या पडीक जमिनीचे केलेले नंदनवन बघितल्यावर हा निर्णय किती हुशारीचा होता, हे सिद्ध झाले.
 रासायनिक खतांच्या आधारावरील शेती भविष्यात परवडणार नाही, हे हेरून वाघधरे यांनी ११ देशी गाई पाळल्या. (आज त्यांची संख्या शंभरवर आहे) गायींच्या शेण-मूत्रावर आधारित सेंद्रिय शेती सुरू केली. ‘कमी खर्चाची सेंद्रीय शाश्वत शेती’ हा त्यांचा मंत्र होता. त्यात असंख्य प्रयोग केले. गोबरगॅस, त्यापासून वीजनिर्मिती, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क याबाबत स्वत:च्या अनुभवातून केलेले प्रयोग व त्यातील बदल अत्यंत यशस्वी ठरले. त्यामुळे शेतीचा खर्च झपाटय़ाने कमी होत गेला. कांदा, भुईमूग, केळी, ऊस, भाजीपाला, फुले अशा अनेक पिकांमध्ये त्यांनी यश मिळवले. पुढे शेतीपूरक व्यवसाय म्हणून केशर नर्सरी सुरू केली. केशर आंबा, आवळा, नारळ, चिकू यांची कलमे केशर नर्सरीत तयार होतात. या वृक्षांची दर्जेदार मातृकलमे त्यांनी देशभरातून धुंडाळून आणली. म्हणूनच केशर नर्सरीतली कलमे म्हणजे ‘शंभर नंबरी सोने’, असे समीकरण बनले.
सुनील चव्हाण (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  
चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २९ एप्रिल
१९०९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. अंधश्रद्धा, जातिभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून देशभक्ती, अहिंसा यांची शिकवण खेडय़ापाडय़ांतून दिली. यामुळेच त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली. ‘अनुभव सागर’, ‘भजनावली’, ‘सेवाधर्म’, ‘राष्ट्रीय भजनावली’ मिळून तीसेक पुस्तके त्यांनी लिहिली. ४,६७५ ओवीसंख्या असलेल्या ‘ग्रामगीता’ व त्यांचा ग्रंथ आजही आदराने वाचला जातो. स्वतंत्र भारतातील ग्रामजीवन कसे असावे याविषयीचा उपदेश करून आत्मोद्धाराचा नवा मार्ग या ग्रंथाद्वारे महाराजांनी दाखवला.
१९१० : संपादक, भाषांतरकार अरविंद गंगाधर मंगरुळकर यांचा जन्म. अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. त्यापैकी ‘मेघदूत’, ‘मराठी! घटना, रचना, परंपरा’, ‘नीतिशतक’ इ. समावेश.
१९२४ : संपादक पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे यांचा जन्म. ‘दै. नवशक्ति’मधील त्यांचे अग्रलेख एकेकाळी गाजले. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘महाराष्ट्राची मुंबई’, ‘महाराष्ट्राचे मन’, ‘महाराष्ट्राचे राजकारण’ आदी पुस्तके. ‘गुळाचा गणपती’ हे विनोदी लेखन, ‘मणीस्यमंतक’, ‘मदालसा’ ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : पित्त विकार : १
आयुर्वेद शास्त्रांत पित्तविकार चाळीस प्रकारचे सांगितले आहेत. त्यातील पुढील पित्तविकारांचा आपण विचार करत आहोत. अंगाला घाण वास, कडकी, कंठशोष, गळून जाणे, तोंड आंबट कडू, तेज नकोसे  होणे, थंड थंड हवेसे वाटणे, निस्तेज त्वचा, राग येणे, लघवी गरम व पिवळी होणे. बऱ्याच वेळा ही लक्षणं इतर विकारांचा एक भाग असे असते. तरीपण स्वतंत्रपणे त्यांचा विचार केला व त्याप्रमाणे उपचार केले तर कदाचित मूळ रोग बराच आटोक्यात येण्यास मदत होते. पित्तविकाराचा विचार करतांना केवळ पित्ताचाच विचार व्हावयास पाहिजे, असे नसून, पित्तप्रकृति माणसाच्या लक्षणांचे विचार करावयास हवा.
  आमच्या महर्षि अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालयात पाचशेचे वर रुग्णांना वमनाचे म्हणजे उलटीचे औषध वेळोवेळी दिले असेल. बहुतांश वमनकर्म ही आम्ही दम्याकरिता करविली. आम्लपित्त, पित्तविकार, खाज, कावीळ, स्थौल्य याकरिता क्वचितच वमनाची गरज व त्याचा योग आमचे रुग्णालयात आला. बहुतेक वमनकर्मात प्रथम खूप कफ व नंतर चमचा दोन चमचेच पित्त पडते. काही वेळा तर ते पडलेलेही दिसत नाही. पित्ताचे वर्णन सामान्यपणे पिवळेजार, दरुगधी, पातळ, तीक्ष्ण, उष्ण असे केले जाते.
आमच्या सुदैवाने एका स्त्री रुग्णाला वारंवारच्या पित्ताच्या तक्रारीकरिता आम्ही ज्येष्ठमध व गेळफळ काढय़ाचे वमन दिले मात्र; तत्काळ जे केवळ पित्त पडू लागले ते दोन तसराळीभर केवळ पित्तच पडत राहिले. आपल्या पोटात एवढे मोठे पित्त साठवणारी ती स्त्री रुग्णा, ते पित्त बघून हबकलीच. पण आम्हालाही हे एक अभूतपूर्व दर्शन वाटले. पित्ताचे पिवळे जर्द रुप, घाण वास, पातळ व बुळबुळीत उष्ण स्पर्श असे सर्व गुण; प्रकर्षांने त्या वमनात दिसत होते. त्या स्त्री रुग्णाला अजूनही अधूनमधून पित्तविकाराकरिता औषध चालू असते. पुन्हा नव्याने आम्हाला पित्तदर्शन घडवायला त्या तयार नाहीत, ही गोष्ट अलाहिदा, पण एकदाच साक्षात पित्तदर्शन घडवून त्यांनी आम्हाला ऋणांत ठेवले आहे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : अस्वस्थता आणि घुसमट
१९६७ ते १९७० माझे आयुष्य उत्तम (!?) होते.. मी उदयोन्मुख होतो. चार पैसे मिळत होते. जर असेच चालू राहिले असते तर चार-आठ खोल्यांचे नर्सिग होम थाटून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बहुतेकांचे असते तसे स्वप्न साकार झाले असते. पण माणसाचे मन मोठे विचित्र असते, माझे चित्रविचित्र असणार. त्या काळची माझी रोजनिशी मला निर्थक वाटू लागली होती. स्वत:चे छोटेसे राज्य होईल, त्यात अडकून पडावे लागेल असले विचार अस्वस्थ करीत होते. त्यातच प्लास्टिक सर्जरीचा किडा डसला होता. त्या विषयात नुसतीच डागडुजी नव्हती. काहीतरी नवे उभारण्याची त्या विषयातली नावीन्यपूर्णता मोठी आकर्षक वाटत असे. टिळक रुग्णालयात तो विभाग नव्हता. लवकरच होण्याची शक्यता नव्हती. त्या काळात प्लास्टिक सर्जरीचा अभ्यासक्रम नुकताच सुरू झाला होता. त्यासाठी पूर्ण वेळ उमेदवारी करणे मला परवडण्याजोगे नव्हते. जे सुखी आयुष्य चालू होते, त्याचा थोडाफार उबग आणि हे नवे प्लास्टिक सर्जरीचे क्षितिज यात मी त्रिशंकू झालो. ‘हा नाद सोड’ असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सल्ला सर्वत्र घुमत होता, पण मन ऐकेना आणि आजूबाजूला संधी नाहीत, अशा अवस्थेत माझ्या कामाचा ओघ कमी करून मी केईएमच्या प्लास्टिक सर्जरी विभागात चकरा मारण्याचा परिपाठ सुरू केला. रात्रीच्या पाटर्य़ा थांबविल्या. प्लास्टिक सर्जरीचे एक गलेलठ्ठ पुस्तक विकत घेतले आणि त्याची पारायणे सुरू केली. वेळ मिळेल तिथे आगगाडीत, बसमध्ये ते वाचत असे आणि अमेरिका इंग्लंडच्या निरनिराळ्या प्लास्टिक सर्जरीच्या विभागांना पत्रे पाठविण्याचा उद्योग आरंभला. सगळीकडून नकारघंटा येत. पण ते प्लास्टिक सर्जरीचे पुस्तक मात्र हळूहळू पाठ होऊ लागले होते. केईएममध्ये शस्त्रक्रिया बघण्यासाठी जात असे, तेव्हा मी आता हळूहळू चर्चेत भाग घेऊ लागलो होतो. बोलण्यात-लिहिण्यात मी कधी कमी नव्हतोच, फक्त हातामध्ये चाकू मिळाला नव्हता. टिळक रुग्णालयात आमच्या विभागात थोडा जुजबी प्रयत्न चालू होता; पण तिथे इतर कामाचा बोजा एवढा प्रचंड होता की, माझ्या हौशीखातर असल्या शस्त्रक्रिया घुसडणे हे योग्य नव्हते. मला वाटते १९७०चा हिवाळा आला आणि माझ्या प्लास्टिक सर्जरीच्या ध्यासाच्या दृष्टीने एकाच वेळी दोन घटना घडल्या. एकात दारुण पराभव झाला आणि दुसऱ्या घटनेने आयुष्याला एकदमच कलाटणी मिळाली. मी यत्किंचितही आहे आणि होतो तेव्हा एवढे नाटय़मय लिहिण्याची खरे तर काय गरज आहे? पण माणसाचे मन आणि नशीब हातात हात घालून चालते हा अनुभव अनेकांना येत असणार. त्या अनेकांशी माझे हे हितगुज एवढाच या लिखाणाचा अर्थ आहे. त्या दारुण पराभवाबद्दल आणि अचानक मिळालेल्या संधीबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com