संगीत क्षेत्रात ‘खालच्या पट्टीतला स्वर’, ‘वरच्या पट्टीतला स्वर’ अशा संज्ञा वापरल्या जातात. खालच्या पट्टीतला स्वर हा कमी कंप्रतेचा असतो आणि वरच्या पट्टीतला स्वर हा जास्त कंप्रतेचा असतो.
समजा धातूची एक तार दोन बिंदूंच्या दरम्यान ताणून बसवली आहे. आता ही तार जर छेडली तर कंप पावते आणि आपल्याला आवाज ऐकू येतो. जर ह्य़ा तारेवरचा ताण वाढवला आणि पुन्हा त्याच प्रकारे ही तार छेडली तर ती अधिक वेगाने कंपन पावत असल्याचं दिसतं. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला होत असलेल्या तिच्या कंपनांची संख्या वाढल्याचं आढळतं. आता जर तारेच्या कंपनांमुळे निर्माण होणारा आवाज ऐकला तर तो वरच्या पट्टीत असल्याचं लक्षात येतं. जास्त कंप्रतेच्या किंवा वरच्या पट्टीतल्या स्वराला ‘उच्च स्वर’ आणि कमी कंप्रतेच्या किंवा खालच्या पट्टीतल्या स्वराला ‘नीच स्वर’ असंही म्हणतात. म्हणजेच ध्वनीची उच्च-नीचता ही त्याच्या कंप्रतेवर अवलंबून असते. इंग्रजीत याला ‘पिच’ असं म्हणतात. आपण याला वरच्या सप्तकातला आवाज आणि खर्जातला आवाज असं म्हणतो.
लहान-मोठेपणा मात्र वेगळा!
आवाजाचा लहान-मोठेपणा मात्र ध्वनीलहरीच्या आयामावर अवलंबून असतो. आयाम म्हणजे काय तर ध्वनीचं प्रसारण ज्या माध्यमातून होत आहे, त्या माध्यमातले कण कंपन पावत असतात. या कंपनांद्वारे आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. या कंपनांमध्ये माध्यमाचे कण आपली जागा न सोडता विशिष्ट बिंदूभोवती कंप पावत असतात. बसल्या जागी आपण जसं डोलतो, काहीसं त्याप्रमाणे. कंप पावताना माध्यमाचा कण एका विशिष्ट दिशेत किती अंतर कापतो, तेवढा त्याच्या कंपनांचा आयाम असतो. हा आयाम मोठा असेल, तर आपल्याला मोठा आवाज ऐकू येतो; तर लहान आवाजाच्या लहरींचा आयाम कमी असतो.
आवाजाचा लहानमोठेपणा हा आवाजाच्या तीव्रतेच्या स्वरूपात मोजला जातो आणि त्यासाठी ‘डेसिबेल’ हे एकक वापरलं जातं.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण ध्वनिप्रदूषण होतं आहे, असं म्हणतो तेव्हा जास्त तीव्रतेचा ध्वनी आपल्याला ऐकू येत असतो; आणि जेव्हा आपण म्हणतो की आवाज कर्कश आहे, तेव्हा आपण त्याच्या उच्चनीचतेबद्दल किंवा कंप्रतेबद्दल बोलत असतो. जेव्हा अतिशय मोठा कर्कश्श आवाज निर्माण होतो तेव्हा त्याची तीव्रता म्हणजेच आयाम जास्त असतो आणि कंप्रताही जास्त असते.
– हेमंत लागवणकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
डॉ. रावुरी भारद्वाज (तेलुगू- २०१२)
भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०१२ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध तेलुगू भाषक कथा कादंबरीकार डॉ. रावुरी भारद्वाज यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वी विश्वनाथ सत्यनारायण (१९७०) आणि डॉ. सी. नारायण रेड्डी (१९८८) या तेलुगू साहित्यिकांचा ज्ञानपीठाने सन्मान करण्यात आला होता.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यतील मोगुलूरू या गावी ५ जुलै १९२७ रोजी रावुरी भारद्वाज यांचा जन्म झाला. पुढे ते गुंटूर जिल्ह्यतील ताडीकोंडा या गावी आले. इथेच ७ वी पर्यंत त्यांचे शालेय शिक्षण झाले. कवी नारायण सुर्वे यांची आठवण यावी अशा काबाडकष्टांतून कारखान्यात मशीनवार तासन्तास उभे राहण्यातून त्यांचा जीवन आणि लेखनप्रवास अनेक वर्षे सुरू होता. आधी शेतात, पुढे कारखान्यात राबताना आसपासच्या कष्टकऱ्यांची आयुष्ये त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यातूनच ‘पुकुदुरालू’ ही त्यांची कादंबरी जन्माला आली. चित्रपटसृष्टीतील पडद्यामागील कलाकारांच्या आयुष्यावरील ही कादंबरी. त्यानंतरची ‘जीवन समरम्’ ही कादंबरीही गाजली. याशिवाय ‘इनुपुतेरा वेक्कुआ’, ‘कौमुदी’ या कादंबऱ्याही तेलुगू साहित्यात प्रचंड लोकप्रिय असून इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले आहेत.
रावुरी भारद्वाज यांनी १७ कादंबऱ्या, ३७ लघुकथासंग्रह, पाच नभोवाणी नाटके, बालसाहित्य, मुलांसाठी श्रुतिका, सहा कथासंग्रह, निबंधसंग्रह असे अनेकविध लेखन केले. ते उत्तम कथाकार होते, कथा सांगण्यातही त्यांचा हातखंडा होता. जेमतेम सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण घेतलेल्या भारद्वाज यांची अनेक पुस्तके विद्यापीठामध्ये अध्ययनासाठी असून, त्यांच्या काही पुस्तकांवर संशोधनही झाले आहे.
त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून, तसेच आकाशवाणीतही काम केले. १९४६ मध्ये ‘जमीन रितू’ आणि १९४८ मध्ये ‘दीनबंधू’च्या संपादकीय विभागात काम करीत होते. ज्योथी, ‘समीक्षा, ‘अभिसारिका’, ‘चित्रसीमा’ आदी मासिकांच्या प्रकाशनात १९५९ पर्यंत ते कार्यरत होते. त्यानंतर हैदराबादच्या आकाशवाणी केंद्रात ते ज्युनियर स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करू लागले.
भारद्वाज यांना साहित्य अकादमी पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार, तेलुगू अकादमी पुरस्कार, बालसाहित्य परिषद पुरस्कार, लोकनायक फाउंडेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. नागार्जुन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान केला. १८ ऑक्टोबर २०१३ रोजी ते निवर्तले.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com