07 March 2021

News Flash

कुतूहल : धातू, अधातू व धातुसदृश मूलद्रव्ये

धातूंची तन्यता खूप जास्त असते आणि थोडय़ाशा बलाने त्यांचा आकार बदलतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावरून आवर्तसारणीतील मूलद्रव्यांची धातू, अधातू आणि धातुसदृश मूलद्रव्ये अशी विभागणी करता येते. एकूण ११८ मूलद्रव्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ९३ (७९ टक्के) धातू आहेत, एकोणीस मूलद्रव्ये ही अधातू आहेत आणि सर्वात कमी म्हणजे फक्तसहा मूलद्रव्ये ही धातुसदृश आहेत.

आवर्तसारणीच्या उजव्या भागात असलेल्या बोरॉनपासून उजवीकडेच खालच्या बाजूस असलेल्या टेल्युरिअमपर्यंत एक रेषा आखली तर त्या रेषेच्या डावीकडे सर्व धातू, रेषेवरील मूलद्रव्ये धातुसदृश आणि रेषेच्या उजवीकडे सर्व अधातू असे चित्र दिसून येते. (अपवाद – हायड्रोजनचा) हायड्रोजन हे मूलद्रव्य अधातूवर्गात येते. परंतु आवर्तसारणीच्या डाव्या बाजूला सर्वात वरती आढळते. तसेच जम्रेनिअम आणि अँटिमनी ही धातुसदृश मूलद्रव्ये रेषेला लागून पण डावीकडे आढळतात.

धातू सामान्य तापमानाला स्थायुरूपात असतात, अपवाद फक्त पाऱ्याचा. पारा सामान्य तापमानाला द्रवरूपात असतो. धातूंचा पृष्ठभाग चकचकीत असून बहुसंख्य धातूंचा रंग चांदीप्रमाणे पांढरा असतो. लाल रंगाचे तांबे, पिवळ्या रंगाचे सोने आणि पिवळसर चंदेरी सिशियम या धातूंचे रंग वेगळे असतात.

धातूंची तन्यता खूप जास्त असते आणि थोडय़ाशा बलाने त्यांचा आकार बदलतो. ते वीज आणि उष्णतेचे सुवाहक असतात. अ‍ॅल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअमचा अपवाद वगळता त्यांची घनता जास्त असते. इतर धातू आणि अधातूंबरोबर ते संमिश्रे बनवू शकतात. रासायनिकदृष्टय़ा सर्व धातूंचे एखादेतरी ऑक्साइड अल्कधर्मी असते.

धातुसदृश मूलद्रव्ये हे धातूंसारखे दिसणारे परंतु ठिसूळ स्थायू पदार्थ असतात. त्यांची उष्णता वाहकता ही धातूंपेक्षा बरीच कमी असते. परंतु ते उष्णतेचे दुर्वाहक नसतात. बहुतेक धातुसदृश मूलद्रव्ये ही विजेची अर्धवाहक असतात. रासायनिकदृष्टय़ा यांची ऑक्साइड्स थोडीशी आम्लधर्मी असतात. बहुतेक अधातू हे सामान्य तापमानाला वायुरूपात असतात आणि ते निसर्गात शुद्ध स्वरूपात मोठय़ा प्रमाणावर आढळतात. ब्रोमिन हा अधातू द्रवरूपात तर कार्बन फॉस्फरस आणि सल्फर हे स्थायुरूपात असतात. अधातूंची घनता अत्यंत कमी असते आणि ते वीज व उष्णतेचे दुर्वाहक असतात. त्यांची ऑक्साइड ही आम्लधर्मी असतात. अधातूंमध्ये हेलिअम, अरगॉनसारख्या राजस वायूंचा एक वर्ग असतो. ज्यांची इतर कुठल्याही मूलद्रव्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होत नाही.

– योगेश सोमण, मुंबईमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 2:48 am

Web Title: metals non metallic and metallic elements
Next Stories
1 अणुभार
2 अँग्लो इंडियन समाज
3 अणूची रचना
Just Now!
X