आजकाल साधारणपणे जेवणातल्या डिशेसमध्ये मका असतो. मक्यामध्ये काबरेहायड्रेट्स अन्न विपुल प्रमाणात असते, शिवाय त्याच्या दाण्याभोवती असलेले सेल्युलोजचे आवरण न पचणारे असते, त्यामुळे पचनमार्ग साफ ठेवायला मदत होते. मक्यापासून तयार केलेला पॉपकॉर्न हा पदार्थ तर मुलाबाळांचा नि तरुणाईचा आवडता पदार्थ होय. त्यातच लोण्यांत तयार केलेल्या पॉपकॉर्नची मजा काही वेगळीच असते, पण सावधान, बरं का!
कृत्रिम लोण्याचा थर दिलेल्या पॉपकॉर्नला खमंग वास येतो ना, त्याने ‘पॉपकॉर्न लंग’ ही व्याधी जडू शकते. आपल्या श्वासातून हा हवाहवासा गंध फुफ्फुसात जातो तेव्हा त्यासोबत एक रसायन आपल्या पोटात जाते. त्याचे नाव ‘डायअ‍ॅसिटील’ होय. वास्तविक, हे नसíगक रसायन लोण्याचा एक घटक असतो व तो दूध, लोणी, मस्का, चीज, बीअर, वाइन यांत सापडतो. या मूळ पदार्थातील त्याचे अस्तित्व मुळीच हानिकारक नसते. त्याचे रासायनिक सूत्र आहे H3COOCH3.. पण, हे रसायन वायुरूपात फुफ्फुसात घुसते तेव्हा तिथल्या लघुश्वासनलिकांना इजा पोहोचते. त्या खराब झालेल्या फुफ्फुसाच्या नळ्या कायमस्वरूपी निकामी होतात. त्याला ‘ब्रोंकाओलिसीस अ‍ॅब्लिटेरंस’ असे म्हणतात.
तुम्हाला पॉपकॉर्नची प्लास्टिक थली हुंगण्याची सवय असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे, हे लक्षात घ्यावे. पॉपकॉर्न भाजणारे विक्रेते आणि पॉपकॉर्नच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांना फुफ्फुसाच्या आजाराचा धोका असतो. दिवसातून दोन वेळा मक्यापासून तयार होणाऱ्या लोणीयुक्त पॉपकॉर्नच्या पिशव्या हजम करणाऱ्यांनी सावधानता बाळगलेली बरी. त्याचप्रमाणे, चित्रपटगृहातील विक्रेतीमुलेसुद्धा या मक्याच्या पदार्थाच्या सतत सान्निध्यात राहिल्याने आपले स्वास्थ्य बिघडवू शकतात.
घरी पॉपकॉर्न तयार करताना एक खबरदारी घेता येते ती म्हणजे ओव्हनमध्ये भाजलेल्या नि फुललेल्या मक्याच्या लाह्य़ा द्रवरूप लोणी लावून खात मजा लुटता येते. शिवाय भाजलेले मकेदेखील खायला चविष्ट असतात, त्याला पसंती दिली तर उत्तमच.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – विल पॉवर म्हणजे काय?
मंदारला डॉक्टरनं गोड पदार्थ खाऊ नका, असं स्पष्ट सांगितलं. केक्स, पेस्ट्रीज, बर्फी यांवर त्याचा जीव होता. त्यानं निग्रहानं ऑफिसातल्या पार्टीत यातल्या सर्व जिवलग गोष्टींना नाकारलं. संध्याकाळी, वाटेत थांबून जिलबी खायची इच्छा झाली, त्यानं ताबा ठेवला. रात्री आईने पाठवलेले मोदक त्यानं बाजूला ठेवले. बिछान्यावर पडल्या पडल्या या सर्व गोष्टी त्याच्याभोवती फेर धरताहेत, असं त्याला वाटलं. मध्यरात्री तो उठला आणि फ्रीजमधल्या सगळ्या ‘मधुर’ गोष्टी गट्ट केल्या.
– राजेशला दिवसभरात इन्स्टंट लॉटरीची तिकिटं काढून नशीब आजमावण्याचा छंद होता. लवकरच त्या गमतीचं व्यसनात रूपांतर झालं. त्यावर विजय मिळवण्याचा त्यानं निकरानं प्रयत्न केला. रोजच्या वाटेवर त्याला लॉटरीची ती छोटी दुकानं दिसायची. त्याचे पाय तिकडे वळत. मोठय़ा कष्टानं तो तिथून न थांबता पुढे जायचा. एके दिवशी त्याला राहावलं नाही. तो तिथे रेंगाळला आणि खिसा रिकामा केला. नंबर लागले नाहीत, पस्तावला.
– निमानं जिममध्ये व्यायाम करण्यासाठी भक्कम फी भरून प्रवेश घेतला. ती पहिले तीन दिवस नियमितपणे गेली. चौथ्या दिवशी जाग आली तेव्हा निश्चयानं पांघरूण भिरकावून जिममध्ये गेली. पाचव्या दिवशी तिला गाढ झोप लागली. सहाव्या दिवशी जिममध्ये उद्यापासून वेळेवर उठून जाऊ असां तिनं ठरवलं. तो उद्या अजून उजाडायचाय..
मित्रा, घरोघरी असे मंदार, निमा, राजेशभाई असतात. त्यांचे मित्र, परिवार, जोडीदार वारंवार त्यांच्याबद्दल म्हणतात, त्यांना स्वत:मध्ये बदल करायचाय पण, त्यांची विल पॉवर- इच्छाशक्ती कमी पडते!
विल पॉवर ही भानगड आपल्या रोजच्या जीवनात, मनोविकासात आणि आर्थिक उत्कर्षांत प्रचंड धुमाकूळ घालते. इच्छा असते, स्वप्नं असतात, अशा, महत्त्वाकांक्षा सगळं असतं, पण विल पॉवर अपुरी पडते.
मित्रा, इथे मांडलेल्या तिन्ही केस स्टोरींचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की आमच्याकडे विल पॉवर अजिबात नसते; असं नाही. तिचा आपण वापर करतो, पण आपल्याला पुरत नाही. काही वेळा, काही काळापर्यंत विल पॉवरचा वापर केल्यावर आपली ऊर्जा नष्ट होते आणि आपण नको त्या प्रलोभन, मोहांना बळी पडतो.
हे समजण्याकरता आपण विल पॉवर एखाद्या स्नायूसारखी असते, असं समजू. उदा. आपण जड वस्तू उचलण्याकरता, चालण्याकरता हातापायांचे स्नायू वापरतो. मग स्नायू थकतात. त्राण राहत नाही. अशावेळी आपण या स्नायूंना उत्तम ट्रेनिंग देतो. त्या स्नायूंची मुळातली शक्ती वाढवतो. त्यांना सांभाळतो, त्यांचा आदर करतो. त्यांच्यावर फुकाचा ताण देत नाही. स्नायूंची अशी काळजी घेतली, जोपासना केली तर आपण यशस्वी होतो. हे विश्लेषण आणि अभ्यास ‘विल पॉवर’करता लागू पडतं. असं समजू  की विल पॉवर हा आपल्या मेंदूचा स्नायू.. ज्याप्रमाणे  शरीरातले स्नायू आपोआप मजबूत होत नाहीत, त्याप्रमाणे ‘विल पॉवर’देखील वाढत नाही. ट्रेनिंग द्यावंच लागतं.
‘विल पॉवर’ म्हणजे चिकाटी आणि साक्षी वृत्ती. मनात उचंबळणाऱ्या मोहांकडे आपण तटस्थ साक्षीभावानं पाहातो, तेव्हा त्या उसळणाऱ्या लाटा कशा आपोआप विरतात, त्यांना ओहोटी लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. त्या अनुभवातून शहाणपण येतं. आपण मोहांच्या आहारी न जाता आपल्याला पोषक आणि उपयुक्त इच्छांना स्वीकारतो आणि एन्जॉय करतो. साक्षीभाव निर्माण होण्याकरता ध्यानधारणा हा सर्वोत्तम मार्ग आहे. नियमितपणे, लक्षपूर्वक ध्यानधारणा करून, आजमावून पाहिल्याशिवाय हे नाही आकळणार..
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – सहकारातून ‘स्वराज्याचे प्रकटीकरण’
‘‘‘मी अमक्या गावचा पाटील आहे’ या पूर्वीच्या भावनेतील मान व जबाबदारी आता राहिलेली नाही. ज्या समाजात प्रतिष्ठा आणि कर्तव्य यांची सांगड आहे तोच समाज जिवंत होय. या दृष्टीने आपण मानाला जितके हपापलेले आहोत तितके जबाबदारीला दिसत नाही. स्थानिक बाबतीत लोकहिताच्या गोष्टी सर्वाच्या विचाराने करता येणे शक्य असता, स्थानिकदृष्टय़ा महत्त्व नसलेले भेदाभेद, पक्षबाजी वगैरे गोष्टी तिथे माजू देण्यात अर्थ नाही. त्यामुळे कार्यक्षमतेला धक्का बसेल. सत्तेची व मानधनाची एक जागा याच दृष्टीने एकाधिकारीपदाकडे पाहून आपले आसन कसे स्थिर राहील याचाच आपण विचार करीत राहणार असल्यास आपली ती मोठी चूक होईल. लोकशाही विकेंद्रीकरण यशस्वी व्हायचे असेल, त्यातून काही बरे निघावे असे वाटत असेल तर, ‘हे स्थळ डावपेच खेळण्याचे नाही, तर उथल्या लोकांची दु:खे दूर करण्यासाठी, त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे पाठवलेली आम्ही मंडळी आहोत’ हे तुम्ही स्पष्टपणे बोलून दाखविले पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे.’’ ध. रा. गाडगीळ १९६२ साली महाराष्ट्र राज्य जि. प. व पंचायती राज्य परिसंवादात बोलताना म्हणतात – ‘‘सहकार ही रजिस्ट्रारची चळवळ नसून जनतेची चळवळ आहे हे दाखवून देणे, ही अवघड जबाबदारी तुमची आहे. सहकारी अर्थव्यवस्थेच्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवावयाच्या आहेत. केवळ सहकाराचे प्रचारात्मक बोलणे सोपे आहे, पण सहकाराची गावगंगा निर्माण करणे फार अवघड .. मानवी समाजाचा कारभार हा एकंदरीने विकेंद्रित असाच चालत असतो. सुव्यवस्थित पण नियंत्रित रीतीने, लोकांनी, लोकांसाठी तो चालवावा अशी ही योजना आहे. आणि अपेक्षेप्रमाणे तो चालत आहे यावरच विकेंद्रीकरणाचे यश अवलंबून आहे. विकेंद्रित लोकशासनाच्या यशातच लोकशाहीचे अंतिम यश आहे आणि ह्याची जबाबदारी तुम्हा लोकनेत्यांवर आहे. तुम्ही हे लोकशाही विकेंद्रीकरण यशस्वी करून दाखविलेत, म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात ‘स्वराज्याचे प्रकटीकरण’ तुम्ही घडवून आणलेत, असे थोडय़ाच काळात दिसून येईल.’’