अरविंद आगटे यांचा जन्म २१ सप्टेंबर १९३९ या दिवशी झाला. ते सूक्ष्मजैव-खनिजशास्त्राचे संशोधक म्हणून जगन्मान्य सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपले सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण गुजरातमधील नवसारी आणि नडियाद या ठिकाणी पूर्ण केले. नंतर त्यांनी डॉक्टरेटसाठी बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ यथे प्रोफेसर जे. व्ही. भट यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून डॉक्टरेट संपादन केल्यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अमेरिकेला प्रयाण केले. सेरॅक्यूज विद्यापीठात डॉ. डोनाल्ड जी लुंडग्रेन यांच्या प्रयोगशाळेत ते रुजू झाले. येथे त्यांनी लोखंडाचे ऑक्सिडीकरण करणाऱ्या अॅसिडीथायोबॅसीलस फेरॉक्सिडान्स या जिवाणूवर संशोधन केले. रॉचेस्टर विद्यापीठात प्रोफेसर वुल्फ विष्णक यांच्या प्रयोगशाळेत संशोधनाला सुरुवात केली. प्रोफेसर विष्णक हे परग्रहावरील जीव संशोधनात अग्रगण्य मानले जातात.
नंतर डॉ. आगटे ऑस्ट्रेलियामधील कॅनबारा येथील ‘बास बेकिंग जिओबायॉलॉजिकल’ प्रयोगशाळेत रुजू झाले. तेथे त्यांचे ‘जिओमायक्रोबायॉलॉजी’ या विषयावरील संशोधन वाखाणले गेले. यालाच बायोलिचिंग किंवा बायोमायनिंग तंत्रज्ञान असे म्हणतात. यात विशिष्ट सूक्ष्मजीवांचा वापर करून धातुकांपासून (ओर) सोने, चांदी, लोखंड, तांबे, कोबाल्ट, झिंक, निकेल, युरेनियम अशा विविध धातूंचे नि:सारण (एक्स्ट्रॅक्ट) केले जाते. कॅनबारा येथील बायोलिचिंग क्षेत्रातील संशोधकांच्या चमूचे डॉ. आगटे यांनी नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली.
स्वदेशात काम करण्याच्या ओढीने डॉ. आगटे यांनी १९७०-७२ मध्ये मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महाराष्ट्रात सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय मूळ धरत होता. ‘जिओमायक्रोबायॉलॉजी’ या विषयाची मुहूर्तमेढ त्यांनी भारतात रोवली. त्यांचा मूळ पिंड शिक्षकाचा होता. आणि म्हणून त्यांनी भारतातील कुठलीच प्रथितयश प्रयोगशाळा न गाठता पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात प्राध्यापकी स्वीकारली. त्यांनी या विभागात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
१९८० साली डॉ. आगटे हे आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे पूर्णवेळ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. येथे त्यांनी ‘जिओमायक्रोबायॉलॉजी’ व ‘बायोहायड्रोमेटालर्जी’ या विषयांतील भारतातील पहिल्या प्रयोगशाळेची पायाभरणी केली. आघारकर संशोधन संस्था, पुणेचे संचालक म्हणून ते १९९९ साली निवृत्त झाले. ४ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.
