कोविड-१९ विषाणू २०१९ डिसेंबरपासून चीनमधून हवेवाटे जगभर पसरला. कोविडने कोट्यवधी लोक आजारी पडले, लाखो मेले. साबणाने हात धुणे, मुखपट्टी बांधणे, सामाजिक अंतर ठेवण्यासारख्या अल्पकालीन उपायांबरोबर योग्य कोविड चाचण्या आणि प्रतिबंधक लसी टोचण्यासारखे दीर्घकालीन उपायही केले गेले.

एखाद्या व्यक्तीला कोविड १९ चा प्रादुर्भाव झालेला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी तीन पद्धतीच्या चाचण्या केल्या जातात.

(१) जलद प्रतिजन चाचणी : यालाच रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट किंवा लॅटरल फ्लो टेस्ट असे म्हणतात. नाक किंवा घशातून घेतलेल्या नमुन्यात करोना विषाणूचे अस्तित्व आहे की नाही हे यात बघितले जाते. यात विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रतिजन (अँटीजेन) प्रथिनांचे अस्तित्व तपासले जाते. परंतु या नमुन्यात विषाणूचे अस्तित्व अत्यल्प असल्यास पृष्ठभागावरील प्रतिजन प्रथिने तपासता येत नाहीत. म्हणजे रोग्याला प्रादुर्भाव झालेला असूनसुद्धा त्याची चाचणी नकारात्मक येऊ शकते. ही या चाचणीची मर्यादा आहे.

(२) आरटी-पीसीआर : याचा अर्थ ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज – पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’. या चाचणीतदेखील नाक किंवा घशातून घेतलेल्या नमुन्यात करोना विषाणूचे अस्तित्व आहे की नाही, हे बघितले जाते. यात पॉलिमरेज चेन रिअॅक्शनच्या तंत्राने अत्यल्प प्रमाणात असलेल्या विषाणूतील आरएनएचे रूपांतर ‘कॉम्प्लिमेंटरी डीएनए’ (सी-डीएनए) मध्ये करून डीएनएच्या अनंत प्रती तयार केल्या जातात. पर्यायाने तपासता येतील इतक्या प्रमाणात पृष्ठभागावरील प्रतिजनांची संख्यादेखील वाढते. अनुरूप प्रतिपिंडाचा वापर करून प्रतिपिंड-प्रतिजन क्रिया सकारात्मक असल्यास (पॉझीटिव्ह) दीप्तीमान चमकदार रंग दिसतो. ही चाचणी १०० टक्के भरवशाची आहे.

(३) IgM व IgG या प्रतिपिंडांची चाचाणी: या चाचणीत रोग्याच्या रक्ताच्या नमुन्यातील IgM किंवा IgG या प्रतिपिंडांचे अस्तित्व तपासले जाते. त्यावरून रोग्याला कोविड होऊन गेलेला आहे का हे समजते. म्हणजेच कोविडचा प्रादुर्भाव झाल्यावर तो जर सौम्य स्वरूपाचा असेल तर त्या विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या रक्तात प्रतिपिंडे तयार होतात. प्राथमिक प्रतिसादात IgM प्रकारची प्रतिपिंडे तयार होतात आणि नंतर IgG प्रकारची प्रतिपिंडे रक्तात वाढतात. या चाचणीत रक्तातील या प्रतिपिंडांचे अस्तित्व तपासले जाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष ग्राह्य धरून कोष्टकात दिल्यानुसार निदान केले जाते.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org