बालवाडीतला एक मुलगा प्रथमच झेंडावंदनाला हजर होता. त्याला विचारलं, ‘मला सांग, हा झेंडा कोणाचा आहे?’ एक सेकंदही न थांबता तो आत्मविश्वासाने म्हणाला, ‘‘आमचा आहे! छोटय़ा गटाचा!’’ त्याच्या अनुभवविश्वातून त्याने दिलेलं एक सुंदर उत्तर.

पहिलीत गेल्यावर हा झेंडा भारत देशाचा आहे, हे कोणा-कोणाकडून ऐकलेलं उत्तर त्याने दिलं. पण भारत देशाचा म्हणजे नक्की कोणाचा हे माहीत नव्हतं. ‘असतो तो आपला एक देश.. त्याचा झेंडा’ असं तो म्हणाला.

वरच्या वर्गात गेल्यावर त्याचं अनुभवविश्व वाढलं. तसं तो योग्य, पुस्तकातली आणि थोरामोठय़ांनी सांगितलेली उत्तरं देऊ लागला.

मुलांमध्ये घडलेले हे बदल म्हणजेच अनुभव विस्तारल्यामुळे झालेला त्यांच्या बुद्धीचा विकास. मुलं म्हणजे लहान आकाराची प्रौढ माणसं नव्हे. मुलांची विचार करण्याची पद्धत ही मोठय़ांच्या विचार करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असते. त्यांचं अनुभवविश्व छोटं असतं म्हणून त्यांनी दिलेली उत्तरंही वेगळी असतात. जसं त्यांचं वय वाढतं आणि अनुभवविश्वही वाढतं तसं मूल वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतं. अगदी लहानपणीही मूल मातीचा गोळा नसतंच. ते काही ना काही विचार करत असतंच, असं जीन पियाजे यांनी पहिल्यांदा सांगितलं. आज हे ऐकायला खूप साधं वाटतं. पण मुलांचं आकलन हे मोठय़ांपेक्षा वेगळं असतं हे प्रयोगातून सिद्ध करणारे ते पहिलेच तज्ज्ञ होते.मुलांना काय वाटतं, हे जग त्यांना कसं जाणवतं, त्यांचे हे पहिलेवहिले अनुभव त्यांच्या मेंदूत कोणती खळबळ निर्माण करतात? त्यांना विचार करायला प्रवृत्त कसं करतात? हे जगासमोर आणण्याचं काम जीन पियाजे यांनी सातत्याने केलं.

त्यांच्या वयानुसार काही प्रश्न ते मुलांना विचारायचे. उदाहरणार्थ, दोन भांडी ते मुलांसमोर ठेवायचे. लहान भांडय़ात जास्त पाणी आणि मोठय़ा भांडय़ात कमी पाणी – आणि विचारायचे की यातल्या कोणत्या भांडय़ात जास्त पाणी आहे, असं तुला वाटतं? लहान मुलं मोठय़ा भांडय़ात जास्त पाणी आहे असं सांगायची. मुलांचं उत्तर चुकलं याचा अर्थ त्यांना अक्कल नाही असा नसतो. कारण याच प्रश्नाचं योग्य उत्तर वय वाढल्यावर त्यांना अचूक यायला लागलं. त्यांनी केलेला तर्क हे त्यांचे वय आणि मन यावर अवलंबून असतो, हे मोठय़ांनी समजून घ्यायला हवं असतं.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com