सध्याच्या सातारा जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४५ कि.मी.वर असलेल्या औंध या गावी इ.स. १६९९ ते १९४७ या काळात औंध या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. परशुराम त्र्यंबक किन्हईकर हे संभीजाराजे आणि राजारामाच्या काळात ख्यातनाम सेनानी आणि प्रशासकीय अधिकारी होते. परशुराम त्र्यंबक यांनी, मोगलांनी घेतलेल्या किल्ल्यांपकी अजिंक्यतारा, पन्हाळा आणि भूपाळगड हे किल्ले परत मराठा साम्राज्यात आणण्याची मोठी कामगिरी पार पाडली. या कामगिरीबद्दल छत्रपतींकडून १६९९ साली त्याला औंध आणि त्याच्या आसपासचा मुलूख जहागिरीत मिळाला.
राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईला प्रशासकीय कामात आणि सनिकी कारवायांमध्ये परशुराम त्र्यंबक यांचा मोठा आधार होता. ताराबाईने त्यांना ‘सुभा लष्कर समशेर जंग’ हा किताब देऊन पुढे १७०१ साली पंतप्रतिनिधी या हुद्दय़ावर नियुक्त केले. पंतप्रतिनिधी हे पद पुढे वारसा हक्काने त्यांच्या घराण्यात चालले.
१८१९ साली पेशवाईच्या अस्तानंतर औंध, भोर, जत, फलटण ही जहागिरी राज्ये साताऱ्याच्या प्रशासनाखाली आली. पुढे १८३९ मध्ये एका पुरवणी तहाने सर्व सातारा जहागिऱ्या ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आल्या. १८४८ साली औंध हे ब्रिटिश संरक्षित, अंकित संस्थान झाले. औंध संस्थानात पुढे श्रीनिवासराव, परशुरामराव, गोपाळकृष्ण वगरेंची शासकीय कारकीर्द झाली.
भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी या औंधच्या शेवटच्या अधिकृत राजांची कारकीर्द (१९०९ ते १९४७) लोककल्याणकारी आणि संस्थानाला वैभवसंपन्न बनविणारी ठरली.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल
कोटा साडी
कोटा साडी ही राजस्थानमधील कोटा गावात आणि मुहमदाबाद, गोहना आणि मउ या उत्तर प्रदेशांतील गावात व त्या परिसरात तयार केली जाते. या साडय़ा पूर्णपणे सुती किंवा पूर्णपणे रेशमी असतात आणि त्यावर चौरसाकृती नक्षीकाम असते. ते ‘रवाट’ म्हणून संबोधले जाते. ही अशी चौकोनी नक्षी कोटा साडीत लोकप्रिय आहे. ह्य़ा साडय़ा तलम असून वजनाला हलक्या असतात.
मूळच्या ‘मसूरिया’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या साडय़ा म्हैसूरमध्ये तयार होत असत. सतराव्या शतकात त्यावेळच्या सरदाराने म्हैसूरहून काही विणकर कोटा गावात आणले. त्यांनी साडीचे विणकाम कोटा येथे सुरू केले. हातमागावर कोटा दोरिया म्हणून ओळखली जाणारी साडी विणली जाते. त्यामध्ये अंगभर चौरस डिझाइन विणलेले असते. कांद्याचा रस आणि तांदळाची पेज या सुतावर अतिशय काळजीपूर्वक चढवली जाते. त्यामुळे सूत मजबूत तर होतेच, शिवाय त्याला जास्तीची फिनििशगची गरज पडत नाही.
ह्य़ा साडय़ा कोटय़ामध्ये ‘मसूरिया’ या नावाने ओळखल्या जातात तर राजस्थानबाहेर ‘कोटा’ ‘दोरिया’ म्हणून ओळखल्या जातात. राजस्थान हातमाग विणकर महामंडळाने पुढाकार घेऊन या साडय़ांमधून लँपशेड, पडदे, स्कर्ट, सलवार खमीज इत्यादी प्रकार तयार केले. पूर्ण रेशमी मसूरिया साडी हातमागावर तयार करायला महामंडळाने मदत केली. कोटा साडीला एक वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. प्लेन साडय़ांमध्ये थोडय़ा जाडय़ा सुताने किंवा जरीने विणलेले चौकडे असतात. आता ब्लॉकिपट्रिंगच्या मार्गाने छपाई करण्याचा पर्याय वापरून या साडय़ांची आकर्षकता वाढवली आहे.
मूळच्या ‘कोटा दोरिया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीमध्ये सूत आणि रेशीम यांचे मिश्रण वापरले जाते. या साडीला रेशमामुळे चमक मिळते तर सुतामुळे मजबुती येते. साडीला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे कोटा दोरियाचे इतर उपयोगासाठी कापड तयार करायला सुरुवात केली आणि या साडय़ा बहुतांश पांढऱ्या किंवा ऑफ व्हाइट रंगाच्या असायच्या. परंतु आता बदलत्या काळात कापडातही बदल झाले आणि रंगाची उधळण करायला सुरुवात झाली. कापड नक्षीने सजवले जाऊ लागले. त्यातच पूर्वी प्राधान्याने सुती साडी तयार करायचे त्याऐवजी रेशमाचा वापरही सुरू झाला.
– दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई office@mavipamumbai.org