scorecardresearch

कुतूहल : निर्देशक जीवाश्म

जीवाश्मांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असल्यास त्यांना ‘निर्देशक जीवाश्म’ असे म्हणता येते.

प्राणी वा वनस्पती मृत झाल्यावर काही वेळेस जमा होत जाणाऱ्या अवसादात गाडले जातात. अनुकूल परिस्थिती मिळाल्यास या मृतावशेषांचे जतन होते. खडकात जतन झालेले अतिप्राचीन कालखंडातले सजीवांचे अवशेष म्हणजे जीवाश्म. खडकांमध्ये सापडणारे ‘इंडेक्स फॉसिल्स’ म्हणजेच ‘निर्देशक जीवाश्म’ हे विशिष्ट प्रकारचे पर्यावरण तसेच विशिष्ट भूशास्त्रीय कालखंड अधोरेखित करतात. भूशास्त्रीय कालमापनात हे निर्देशक जीवाश्म महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध भूशास्त्रीय कालखंडांच्या मर्यादा या निर्देशक जीवाश्माच्या साहाय्याने ठरवता येतात, तसेच हे जीवाश्म ज्या खडकात आढळतात, त्या खडकांचा सहसंबंध इतर भागांतील त्याच कालखंडातील खडकांशी स्थापित करण्यामध्येदेखील हे जीवाश्म कळीची भूमिका बजावतात. 

जीवाश्मांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असल्यास त्यांना ‘निर्देशक जीवाश्म’ असे म्हणता येते. म्हणजेच निर्देशक जीवाश्म म्हणून ओळखली जाण्यासाठी त्या जातीची रूपवैज्ञानिक लक्षणे वैशिष्टय़पूर्ण असावी लागतात. मोठय़ा भौगोलिक परिघात अशा जीवाश्मांचे अस्तित्व आढळून येते, तथापि निर्देशक जीवाश्म असणाऱ्या जाती पृथ्वीतलावर अवतीर्ण झाल्यापासून नामशेष होईपर्यंतचा कालावधी हा मात्र मर्यादित असतो. त्यामुळे त्या विशिष्ट भूशास्त्रीय कालखंडावर ते मोहोर उमटवत असतात. प्रस्तरवैज्ञानिक कालव्याप्ती कमी असूनही जीवाश्मांच्या या जातींची भौगोलिक क्षेत्रव्याप्ती विशाल असते. याचाच अर्थ त्यांची प्रजननक्षमता प्रचंड असते. उत्क्रांतीद्वारे हे बदल झाल्याने या जातींची निर्मिती झालेली असते. त्या बदलांमुळेच त्यांची रूपवैज्ञानिक लक्षणे त्याच प्रजातीच्या इतर जातींपासून वेगळी अशी सहजपणे ओळखता येतात. निर्देशक जीवाश्माची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :

 ‘व्हिव्हिपेरस ग्लेकिअलिस’ हे गोडय़ा पाण्यात आढळणाऱ्या गोगलगायीचे विलुप्त झालेले जीवाश्म आहे. जे प्लाईसटोसीन या भूशास्त्रीय कालखंडात सुरुवातीच्या काळात (अर्ली प्लाईसटोसीन) अस्तित्वात होते. त्याचप्रमाणे अर्चिओसायठीड्स या विलुप्त झालेल्या समुद्री प्राण्यांचे जीवाश्म कॅम्ब्रिअन कालखंडाच्या सुरुवातीचे निदर्शक आहेत. 

मेसोझोईक कालखंडामध्ये म्हणजेच द्वितीयक महाकल्पामध्ये अमोनाइट्स हे प्राचीन समुद्री जलचर हे निर्देशक जीवाश्म म्हणून ओळखले जातात. २४५-६५ दशलक्ष वर्षांपूर्वी ते अस्तित्वात होते, त्यानंतर या महाकल्पाच्या शेवटी झालेल्या जीवसृष्टीच्या सामूहिक विनाशात (मास एक्स्टिन्क्शन)  ते नामशेष झाले. पेरीिस्फकटस हे अमोनाइट्स जुरासिक कालखंडात मध्यापासून शेवटपर्यंत अस्तित्वात होते व त्या कालखंडावर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. क्रिटॅशिअस कालखंडाच्या शेवटी स्केफाइट्स हे अमोनाइट्स अस्तिवात होते जे त्या काळाचे निर्देशक जीवाश्म आहेत. अशा प्रकारे निर्देशक जीवाश्म हे ठरावीक कालखंडावर आपला ठसा उमटवतात.

याचा उपयोग पुढे त्या काळातील खडकांचे भूशास्त्रीय वय / कालावधी ठरवण्यासाठी होतो.

योगिता पाटील 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Introduction to index fossil zws

ताज्या बातम्या