स्थलांतर म्हणजे खाद्य, निवारा व प्रजनन यांसाठी पक्ष्यांनी केलेला हजारो मैलांचा द्विमार्गी प्रवास! उत्तर गोलार्धात अतिशीत काळाची प्रतिकूल पर्यावरण परिस्थिती निर्माण होताच ही पाखरे दक्षिण गोलार्धातील तुलनेने उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात. कालांतराने त्यांच्या मूळ प्रदेशातील स्थिती अनुकूल झाल्यावर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. प्रवासात ठरावीक विश्रांतीस्थानी आश्रय घेत त्यांच्या निश्चित उड्डाणमार्गाने ते येतात. पायांना किंवा पंखांना टॅगिंग करून त्यांचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न मुंबईतील बीएनएचएस संस्थेतील पक्षीतज्ज्ञ करत आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील वालुकामय व खडकाळ किनाऱ्यांवर स्थलांतरित पक्षी वस्तीला येतात. सागरी अधिवासात असणारे पाणकिडे, छोटे मासे, मृदुकाय, झिंगे, खेकडे यांसारखे खाद्य या काळात मुबलक मिळते. उदरभरण आणि पिल्लांचे संगोपन यासाठी पर्यावरणीय परिस्थिती सुयोग्य असते. त्यामुळे साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यापासून एप्रिलपर्यंत त्यांचे इथे वास्तव्य असून तापमान वाढू लागल्यावर हे पक्षी परततात.

हेही वाचा >>> कुतूहल:‘स्फेनीसिडी’ कुळातील पेंग्विन

विविध प्रजातींचे कुरव (गल्स), सुरय (टर्न्‍स), चिखल्या (प्लव्हर्स), तुतारी (सॅण्ड पायपर्स), रंगीत तुतारी (रडी टर्न स्टोन) असे विविध द्विजगण हजारोंच्या संख्येने येतात. कझाकिस्तान, किरगिझस्तान येथून आलेले डोक्यावर काळय़ा व तपकिरी टोपीचे ब्लॅक हेडेड व ब्राऊन हेडेड गल्स, पलाश, ह्युजलीन गल्स ह्यांच्या उड्डाणाच्या हालचालींचे निरीक्षण करणे म्हणजे एक पर्वणी असते. लाल, केशरी रंगाच्या चोचीचे, काळय़ा पांढऱ्या रंगसंगतीचे सुरय (टर्न्‍स), कॅस्पियन टर्न्‍स, गल बिल्ड टर्न, व्हिस्कर्ड टर्न, प्लव्हर्स, सॅण्ड पायपर्स हे आपल्या किनाऱ्यांवर हिवाळय़ात दिसतात. रंगीत तुतारी खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर खाद्य शोधतात. आक्र्टिक, आयर्लंड, स्कॉटलंड या देशांमधून येणारा व्हिम्बरेल आणि किनाऱ्यावर दुर्मीळ असलेला व युरोपातून येणारा कालव फोडय़ा (युरेशियन ऑयस्टर कॅचर) हे क्वचित दिसतात.

हेही वाचा >>> कुतूहल: जागतिक ऑक्टोपस दिन

उरण खाडी व नजीकच्या पाणथळ जागा, अलिबागजवळील समुद्रकिनारे, वसईजवळील मिठागरे, घारापुरीची लेणी, गेटवे ऑफ इंडिया, अर्नाळा, शिवडीजवळच्या पाणथळ जागा, भांडुप पंपिंग स्टेशन आणि ठाणे खाडी ही ठिकाणे मुंबईकरांना स्थलांतरित समुद्रपक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट आहेत. नोव्हेंबर महिन्यात ठाणे खाडीत हजारो लालगुलाबी पंखांचे रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पाहणे हा सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो.

– डॉ. पूनम कुर्वे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org समुद्री कुरव (सी गल्स)