स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गमतीशीर आणि विचित्र वाटणाऱ्या काही पात्रता कसोटय़ांविषयी जाणून घेऊ या. एका कसोटीचे नाव आहे कॉफी कसोटी. यात स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोबोटला एखाद्या अमेरिकन घरात जाऊन कॉफी करण्यास सांगितले जाते. त्याने हे काम नीट पार पाडले, तर त्याच्यात स्वजाणीव आहे असे समजतात.

आणखी एका कसोटीचे नाव आहे ‘सफिरग टोस्टर’ कसोटी. ही जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील संशोधकांनी पुढे आणली आहे. यामध्ये मानोविज्ञानाचा (सायकॉलॉजी) आधार घेण्यात आला आहे. यात ज्या स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेची कसोटी घ्यायची आहे तिला एका ठरावीक मुदतीसाठी एकांतवासात (सगळे आगम (इनपुट) आणि निर्गम (आउटपुट) बंद करून) कार्यरत ठेवण्यात येते. त्यानंतर तिला बाहेर काढून नेहमीचे काम दिले जाते. तिच्या कार्यक्षमतेवर अनुचित परिणाम झाला आहे का, हे तपासले जाते. झाला असेल तर पुन्हा किती काळाने ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करू लागते ते पाहिले जाते. यावरून या यंत्रणेला स्वजाणीव आहे की नाही ते ठरवले जाते.

हेही वाचा >>> कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या

याशिवाय कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा विविध देशांमधील संगणक शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ अशा एकूण १९ जणांच्या आंतरराष्ट्रीय चमूने एक कसोटी किंवा कसोटी म्हणण्यापेक्षा चौदा निकषांची एक यादी तयार केली आहे. त्यांच्या प्रस्तावानुसार हे निकष पार करणाऱ्या स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणांना स्व-जाणीव आहे, असे म्हणता येईल.

स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे खंदे पुरस्कर्ते आहेत तसेच त्याचे कडवे विरोधकही आहेत. इलॉन मस्क यांच्यासारखे कित्येक  उद्योगपती आणि स्टिफन हॉकिंगसारखे अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये फार पुढे जाऊ, नयेत अशा आग्रही मताचे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक दुष्परिणाम त्यांनी अधोरेखित केले आहेत. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे तोटे किंवा दुष्परिणाम त्यांनी मांडले आहेत ते सर्वच अधिक तीव्रतेने स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेला लागू पडतात. याशिवाय स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेची सगळयात मोठी भासमान भीती म्हणजे एक दिवस ती मानवावर कुरघोडी करून एकतर मानवाला गुलाम करून ठेवेल किंवा मानववंश नष्ट करेल.

शेवटी जाता जाता एक प्रश्न. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता मानवाला त्याच्या मेंदूमध्ये ‘न्यूरालिंक’सारखी ‘चिप’ बसवून अंकीय साधने नियंत्रित करता येऊ लागली आहेत. ही चिप जर स्वजाणीव असणारी असेल तर त्या माणसाची स्वजाणीव आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेची स्वजाणीव यांचे एकमेकांशी पटेल का, की त्यांच्यात खडाजंगी होईल?

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org