आपण टीव्हीवर अनेक साबणाच्या जाहिराती पाहतो ज्यात असे दाखवले जाते की, हातावर किती ‘जिवाणू’ असतात आणि ते साबण वापरल्यावर कसे नष्ट होतात. हे जिवाणू दाखवण्यासाठी अनेक वेळा एक साधे भिंग वापरले जाते. साध्या भिंगाने हातावरील सूक्ष्मजीव पाहणे शक्य नाही. जाहिरातींमध्ये हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात दाखवले जाते.

सूक्ष्मजीव फक्त सूक्ष्मदर्शकाने दिसू शकतात. जिवाणू पाहण्याची जादू शक्य झाली ती एका सामान्य माणसाच्या जिज्ञासेमुळे. त्याचे नाव होते अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक. ते डच व्यापारी आणि शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १६३२ रोजी डेल्फ्ट, नेदरलँडमध्ये झाला.

ल्युएनहॉकनी सुरुवातीला कापड व्यापारात नोकरी केली. उत्तम दर्जाचे कापड तपासण्यासाठी ते भिंगाचा वापर करत असत. कालांतराने भिंगांबद्दलची त्यांची रुची वाढली, त्यामुळे त्यांनी स्वत: भिंग बनवण्यास सुरुवात केली. याच भिंगांपासून त्यांनी साधेसोपे पण अत्यंत प्रभावी सूक्ष्मदर्शक तयार केले. हे सूक्ष्मदर्शक त्यांच्या काळातील इतर सूक्ष्मदर्शकांपेक्षा अधिक शक्तिशाली, सुस्पष्ट होते. १६७४ मध्ये, त्यांनी तळ्यातील पाण्याच्या थेंबामध्ये हालचाल करणारे अतिशय लहान सजीव पाहिले. त्यांनी त्यांना ‘अनिमलक्युलिस’ असे नाव दिले. आज आपण त्यांना जिवाणू आणि आदिजीव म्हणतो. मानवाने असे सूक्ष्म सजीव पाहण्याची ही पहिलीच वेळ होती.

ल्युएनहॉकनी या सूक्ष्म सजीवांची निरीक्षणे इंग्लंडमधील रॉयल सोसायटीला पाठवली व एकच खळबळ माजली. सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही; पण पुढे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने त्यांची निरीक्षणे तपासली आणि मान्य केले की, एक नवीन विश्व उलगडले आहे, तेच हे सूक्ष्मजीवांचे विश्व. ल्युएनहॉक हे सूक्ष्मजंतूंना पाहणारे प्रथम निरीक्षक ठरले. यामुळेच त्यांना ‘सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक’ म्हणतात. याशिवाय, त्यांनी तोंडातील जिवाणू, रक्तातील लाल पेशी आणि शुक्राणूदेखील पाहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ल्युएनहॉक यांच्या एक भिंग असलेल्या सूक्ष्मदर्शकाची वर्धनक्षमता एखादी वस्तू २०० ते ३०० पटीने मोठी करून दाखवू शकण्याच्या क्षमतेची होती. आजचे संयुक्त भिंगाचे सूक्ष्मदर्शक त्यापेक्षा अधिक सक्षम असून त्याची वर्धनक्षमता हजार ते पंधराशे पट आहे. तंत्रज्ञानाची ही वाटचाल पुढे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकांपर्यंत पोहोचली, ज्यांच्या मदतीने आपण १० लाख पट वर्धन करून विषाणू, डीएनए आणि अणूंच्याही पातळीवर पाहू शकतो. हे सर्व शक्य झाले ते ल्युएनहॉक यांच्या एका साध्या भिंगामुळे!
डॉ. विनायक पांडुरंग सुतार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org