कुतूहल : शुभाशुभ संख्या

सजीव ते निर्जीव किंवा निराकार अशा कुठल्याही स्वरूपातील वस्तूवर श्रद्धा ठेवणे हा मानवी विचारसरणीचा भाग आहे, अनेकदा ती त्याची गरज बनते. मानवाने निर्माण केलेल्या अमूर्त संख्यादेखील त्यास अपवाद नाहीत. म्हणून काही संख्या ‘शुभ’, तर काही ‘अशुभ’ मानल्या जातात. काही वेळा या श्रद्धा मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धांचे रूप घेताना आढळतात. संख्यांना विशिष्ट संकेत व अर्थ देऊन ‘न्युमरॉलोजी’ […]

सजीव ते निर्जीव किंवा निराकार अशा कुठल्याही स्वरूपातील वस्तूवर श्रद्धा ठेवणे हा मानवी विचारसरणीचा भाग आहे, अनेकदा ती त्याची गरज बनते. मानवाने निर्माण केलेल्या अमूर्त संख्यादेखील त्यास अपवाद नाहीत. म्हणून काही संख्या ‘शुभ’, तर काही ‘अशुभ’ मानल्या जातात. काही वेळा या श्रद्धा मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धांचे रूप घेताना आढळतात. संख्यांना विशिष्ट संकेत व अर्थ देऊन ‘न्युमरॉलोजी’ हा व्यक्तिगत भविष्य वर्तवण्याचा एक व्यवसाय बनला आहे. उदाहरण म्हणून १३ व ६६६ या संख्या घेऊ. अनेक समाजांत व देशांत त्या ‘अशुभ’ मानल्या जातात. त्याउलट, ७८६ ही संख्या काही लोकसमूहांत शुभ मानली जाते. कित्येक धार्मिक व अन्य आख्यायिका या संदर्भात पुढे केल्या जातात. आजच्या अत्याधुनिक काळातदेखील काही देशांतील हॉटेल्समध्ये १३ क्रमांकाची खोली किंवा मजला नसतो, विमानात १३ वी ओळ नसते. दिनांक १३ रोजी शुक्रवार असेल आणि रस्त्यावर काळे मांजर दिसले तर मोठे अरिष्ट ओढवणार असे मानणारे तसेच अमेरिकेच्या अपोलो १३ अंतराळयानाला झालेला अपघात १३शी जोडणारे अनेक महाभाग सापडतात. योगायोगाने घडलेल्या अशा घटना त्या संख्यांबाबत गैरसमज आणखी दृढ करतात. बऱ्याच जणांना ‘triskaidekaphobia’ म्हणजे १३चा भयगंड सतावतो, तर काही लोक ‘triskaidekaphilia’ म्हणजे १३च्या प्रेमाने पछाडलेले असतात!

तथापि, गणितात आणि संख्याशास्त्रात सर्व संख्या निरपेक्षपणे अभ्यासल्या जातात. त्यांचे विशिष्ट गणिती गुणधर्म सापडल्यास त्यांची नोंद घेणे पुरेसे असते; विश्लेषण करताना त्यांचा उपयोग केला जातो. जसे की, १३ ही मूळसंख्या आहे, तिच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी ३१ ही संख्यादेखील मूळसंख्या आहे. १३२ = १६९ आणि ३१२ = ९६१ म्हणजे दोन्ही उत्तरे १, ६ व ९ या अंकांनी तयार होतात, तसेच १३३ = २१९७ आणि ३१३ = २९७९१ या दोन्ही उत्तरांत १, २, ७, ९ हाच संच वापरला जातो, १३ ही फिबोनासी मालिकेतील संख्या आहे वगैरे. गणिताच्या दृष्टीने १३ ला अपवादात्मक किंवा ‘अशुभ’ मानण्याचा कुठलाही पुरावा नाही. तसेच ६६६ ही सम संख्या पहिल्या सात मूळसंख्यांच्या वर्गाची बेरीज आहे, म्हणजेच २२+३२+५२+७२+११२+१३२+१७२ = ६६६. त्याशिवाय ६६६ = ३६-२६+१६ आणि ६६६ = १३+२३+३३+४३+५३+६३+५३+४३+ ३३+ २३+१३ इत्यादी. मथितार्थ असा की, संख्यांचा आपल्या आयुष्यातील घटनांशी असा संबंध जोडणे हे मनाचे खेळ आहेत. तरी शुभाशुभ संख्यांच्या विळख्यात स्वत:ला गोवू नका असे गणित सांगते!

– डॉ. विवेक पाटकर

 मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Number 13 in numerology numerology meanings of 13 zws

Next Story
मनमोराचा पिसारा.. या फुलांच्या गंधकोशी
ताज्या बातम्या