scorecardresearch

प्रबोधन पर्व: उपकार, औदार्य आणि त्याग

‘‘हिंदू धर्म हा स्पर्शास्पर्शास महत्त्व देत असून जातिमत्सर वाढवीत आहे. खरा आर्यधर्म हा संग्राहक आहे.

‘‘हिंदू धर्म हा स्पर्शास्पर्शास महत्त्व देत असून जातिमत्सर वाढवीत आहे. खरा आर्यधर्म हा संग्राहक आहे. पण त्याच्या योगाने भिन्न भिन्न जातींचा, पंथाचा व धर्माचा एकोपा होण्यास मदत होणार आहे.. माझ्याशी मित्रभावाने वागणाऱ्यांना व तत्समान जातींना मी कधीही अंतर देणार नाही. मी माझ्या ध्येयाच्या विरुद्ध वर्तन करणार नाही. माझ्या स्पष्ट वक्तव्याबद्दल त्रास सहन करावा लागला तरी तो मी सहन करण्यास तयार आहे.. या कोटय़वधी अस्पृश्य जनतेसाठी झटणे हे एक असे कर्तव्य आहे की, त्याचे चीज होईल असे वाटत नाही. या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याइतपत ते सज्ञानही नाहीत किंवा त्यांना ते कळतही नाही. परंतु हे कर्तव्य अतिशय त्यागाने व उदार वृत्तीने करावे लागते.’’ अस्पृश्यतेविषयी असे सामंजस्याचे उद्गार काढणारे शाहू महाराज जातिभेदाविषयी मात्र अतिशय परखडपणे बोलतात-
‘‘नुसत्या जन्माने क्षत्रिय अगर ब्राह्मण असलेल्या लोकांचा आता कोणी आदर करणार नाही. आपण जन्मापेक्षा गुणधर्माने क्षत्रिय झाले पाहिजे.. सामाजिक समता व संघटना यासाठी ऐक्य, विश्वास, परस्पर प्रेम आणि चिकाटीने केलेले दीर्घ प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत.. जोपर्यंत ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वावर प्रत्यक्षपणे हल्ला होऊन ते नाहीसे होत नाही, तोपर्यंत ब्राह्मणेतरांची परावलंबी स्थिती दूर होणार नाही.. धार्मिक बाबतीत बहुजनांच्या मार्गात ज्या अडचणी निर्माण होतील, त्या दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. पुरोहितांशी तुल्यबळ ठरतील, असे मराठे आपल्या पदरी असणे आवश्यक आहे.. जातिभेद मोडण्याचे प्रयत्न केवळ खालच्या वर्गाकडून सुरू झाल्यास त्याचे परिणाम अनर्थकारी होण्याचा संभव आहे. तेच काम उच्च म्हणविणाऱ्या लोकांकडून प्रथम झाल्यास ते स्वार्थत्यागाचे उदाहरण इतर सर्व जातींना बोधप्रद होईल.’’
कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ
प्रा. एम. एम. शर्मा
१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिटय़ूूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. रसायन अभियांत्रिकीमधील सर्व शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. रासायनिक प्रक्रिया घडत असताना संयंत्रामधील सर्व घटकांच्या निरनिराळ्या टप्प्यांत होणाऱ्या मास ट्रान्स्फरच्या हालचालींवर त्यांनी केलेले संशोधन जागतिक मान्यतेचे ठरले. निरनिराळ्या अवस्थेतील रसायनांच्या प्रक्रियांवरील संशोधन, उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) आणि त्यांच्या विविध स्वरूपांचे परिणाम, आयन प्रक्रिया उत्प्रेरक (आयन एक्स्चेंज कॅटॅलिस्ट) आणि रासायनिक प्रक्रियातील विघटन या विषयात त्यांनी मौलिक संशोधन केले. गुंतागुंतीच्या दोन किंवा जास्त अवस्थेतील रासायनिक प्रक्रियेवर त्यांनी संशोधन केले व त्यायोगे अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्यांनी मोजमापनाकरिता शोधून काढलेल्या नवीन पद्धतीने अतिशीघ्र रासायनिक क्रियांची गती मोजणे शक्य झाले. पदार्थाच्या रासायनिक संयंत्रात पदार्थाच्या शुद्धीकरिता पदार्थ शोषण व त्याचे विघटन या क्रियांना फार महत्त्व असते व अशा प्रकारच्या प्रक्रियांसाठी, मूलभूत संशोधनातून त्यांनी गणिती सूत्रे तयार केली. दोन द्रव पदार्थातील मिश्रण व त्याचा रासायनिक प्रक्रियांचा उपयोग या विषयातही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. रासायनिक पदार्थाच्या शुद्धीकरणाकरिता उपयोगात येणाऱ्या प्रक्रिया ऊध्र्वपातन, स्फटिकीकरण इत्यादींमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करून त्यांचा उपयोग रसायन अभियांत्रिकीमध्ये त्यांनी मोठय़ा प्रमाणात केला. प्रा. शर्मा यांनी ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने फेलो म्हणून स्वीकारले असून भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा नागरी सन्मान दिला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. जे. बी. जोशी यांच्यासारखे त्यांचे विद्यार्थी दिगंत कीर्तीचे आहेत, तर मुकेश अंबानींसारखा त्यांचा विद्यार्थी आज भारतातील अव्वल दर्जाचा उद्योगपती आहे.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org 

मनमोराचा पिसारा: शाळा निवडताना..
शाळा निवडणं हा मोठा प्रश्न उभा राहिला. शाळा नामांकित असावी, तिथले शिक्षक उत्तम प्रशिक्षित असावेत, हे तर महत्त्वाचं होतं, त्याचबरोबर शाळेतले इतर विद्यार्थी कसे असतील? कोणती ध्येयं आणि उद्दिष्ट त्यांच्या कुटुंबांची असतील? .. अशा गोष्टींची यादी केली. आसपास चौकशी केली तेव्हा विविध मतं मिळाली. कोणी म्हणे, अमुक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पुढे काहीच वैशिष्टय़पूर्ण कामगिरी केली नाही. सबब तिला नापास करा. कोणी म्हणे, तिथे पालकसभेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जाहीर चर्चा करतात. त्यामुळे आपली उगीचच नाचक्की होते.  कोणी म्हणे, त्या शाळेत उत्तम शिक्षण देतात, पण शिक्षक फारच कडक स्वभावाचे आहेत. कोणी म्हणालं, शाळा तशी बरीय, पण गृहपाठाचं ओझं आपल्यावर टाकतात, मग कशाला इतक्या फिया घेतात?
त्यातल्या त्यात सोयीची शाळा अखेर निवडली. रात्री तिथेच जाऊन प्रवेश फॉर्म मिळाला. (नंतर कळलं की ‘वर’ पैसे दिले, की लोक फॉर्म घरपोच देतात!) मग या शाळेतल्या प्रवेशपूर्व मुलाखतीची तयारी  करू लागलो. कोणते प्रश्न पालकांना नि कोणते विद्यार्थ्यांना हा संभ्रम निर्माण झाला. कोणा पालकांना म्हणे आइनस्टाइनच्या  सिद्धान्ताचा इतिहास विचारला, तर कोणाला संख्याशास्त्रीय सिद्धान्त. विद्यार्थ्यांची मुलाखत त्यामानाने सोपी होती. निरीक्षण, शारीरिक प्रकृतीची तपासणी इतपतच.
आधी वाटायचं, शाळाबिळा नकोच. होम टय़ूशन्स ठेवाव्यात म्हणजे शिक्षक जातीने शिकवतील, पण तो पर्याय बाद केला. घरी एकुलत्या एकाला शिकवलं, तर त्याचे गुण इतरांना कसे कळणार?
तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांला शाळेत का घालायचं आहे, असा अपेक्षित प्रश्न विचारल्यावर उत्तर तयार होतं.
आमच्यापुढे तीन उद्दिष्टं आहेत.
१) त्याला शिक्षणाच्या जोरावर डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी.
२) आधी गल्लीतल्या, मग उपनगर, शहर, जिल्हा, प्रदेश, राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेत अव्वल नंबर मिळावा. पेपर, टीव्ही चॅनलसकट सर्वत्र त्याचं नाव व्हावं. पुढेमागे सरकारी कोटय़ातला भूखंड मिळावा. प्रवासात खास कन्सेशन मिळावं. झालंच तर कुठल्याही प्रवासात आम्हाला टोल भरावा लागता नये, इतका तो ख्यातनाम व्हावा.
३) यापैकी काही न जमल्यास, त्याला आधी बॉलीवूड, नंतर हॉलीवूडमध्ये सिनेमात काम मिळावं. तिथे अगदी ऑस्कर हुकलं तरी चालेल, निदान नॉमिनेशन..
मुलाखतकारांनी आम्हाला थांबवलं. ते सौजन्याने म्हणाले, ‘‘हे बघा आम्ही इथे जीवनशिक्षण देतो. आनंदाने कसं जगावं, शिस्तपालन करून स्वत:चं आणि समाजाचं जीवन सोयीस्कर कसं करावं हे शिकवतो. परस्परांशी प्रेमानं वागावं, शांत तरी उत्साहाची लकाकी डोळ्यांत कशी असावी हे शिकवतो. आळशीपणा सोडून, ऐदीपणा न करता खेळकर, आरोग्यसंपन्न जीवनाचे धडे इथे देतो. आपला काही तरी गैरसमज झालाय. हे डॉग स्कूल आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी पलीकडच्या बॉक्सटाइप इमारतीतल्या पटांगणविरहित माणसांच्या शाळेत टाका. तिथल्या अभ्यासक्रमात आनंदाने कसे जगावे? जीवनमूल्ये कशी जपावीत? हे विषय करिक्युलममध्ये नाहीत! आम्ही आनंदी, खेळकर, प्रशिक्षित डॉग घडवतो.’’
आम्ही आमच्या कुकूरला डॉग स्कूलमध्ये घातलं.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Renaissance age benefaction generosity and sacrifice