डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@gmail.com

शारदाबाईंचे नाव साहित्यक्षेत्रात काही नवीन नव्हते. त्यांनी लिहायला घेतला होता तो ग्रंथ खरोखरीच महत्त्वाचा होता. ग्रंथलेखनाचे काम पूर्ण करण्याकरिता त्या अहोरात्र वाचन, मनन, चिंतनात व्यग्र राहात असत. इतक्या की त्या आपल्या खाण्यापिण्याकडे किंवा प्रकृतीकडेही काळजीपूर्वक पाहात नसत. त्यांचे सर्व चित्त हाती घेतलेला ग्रंथ पूर्ण कसा होईल इकडेच असे. नातेवाईकांनादेखील त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असे. शेवटी तो ग्रंथ पूर्ण झाला. शारदाबाई जरा सुखावल्या. आता त्या ग्रंथाचे लोकार्पण कसे करावे या विचारात त्या रमल्या होत्या. शेवटी तोही कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची तारीख, स्थळ, प्रकाशनासाठी येणारे पाहुणे, प्रसिद्धी सगळय़ाची सिद्धता झाली. पण..

हा ‘पण’च माणसाच्या आयुष्यात नको तिथे आडवा येतो. माणूस मनातल्या मनात काही मनसुबे रचतो खरा पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. प्रकाशनाच्या दिवशीच घडू नये ते घडले. शारदाबाईंची तब्येत अकस्मात बिघडली. बिघडली ती इतकी बिघडली की त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आनंद कोणालाच घेता आला नाही. खरेतर हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या आयुष्याची कमाई होती. पण नियतीने आपला डाव बरोबर साधला. त्या प्रकाशनाला तर जाऊ शकल्याच नाहीत, पण त्यांचे प्राण वाचले यातच सर्वाना आनंद मानावा लागला. अखेर पिकलेल्या उंबराचा आस्वाद घेणे दूरच राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘उंबर पिकणे’ म्हणजे अपेक्षांची पूर्ती होण्याचा क्षण जवळ येणे. असे म्हणतात की अस्वलाला पिकलेली उंबरे खूप आवडतात. पण अस्वलाचे डोळे आले तर तो आपल्याला आवडणाऱ्या पिकलेल्या उंबरांचा आस्वाद घेऊ शकत नाही. ती उंबरं चाखायला त्याची शारीरिक अनुकूलता नसते त्यामुळे त्याची आलेली चांगली संधी हुकते. एखादी सुवर्णसंधी भोगावयाची असेल तर त्यासाठी नशिबाची साथ लागतेच. हा या म्हणीचा अर्थ आहे. आपण एक ठरवतो पण सर्व आपण मनात कल्पिल्याप्रमाणे होतेच असे नाही. याचा प्रत्यय आपल्या अनेकदा येतो.