ज्या मूलद्रव्याच्या अणूच्या इलेक्ट्रॉनची कक्षा (क्षमतेनुसार) पूर्ण भरलेली असते असे अणू स्वत:तच मशगूल असतात. ते इतर अणूंशी दोस्ती करायला जात नाहीत. किंवा रसायनशास्त्राच्या भाषेत बोलायचं तर अलिप्त किंवा निष्क्रिय असतात. अशा मूलद्रव्यांना ‘नोबल मूलद्रव्ये’ असे संबोधतात. आवर्त सारणीतील ‘नोबल मूलद्रव्ये’ गटातील पहिले मूलद्रव्य हेलिअम!
हेलिअमच्या केंद्रकात दोन प्रोटॉन आणि दोन न्युट्रॉन असतात आणि केंद्राकाबाहेर दोन इलेक्ट्रॉन असतात. हायड्रोजननंतरचे हे पहिलेच मूलद्रव्य आहे, ज्यात न्युट्रॉनचा समावेश झालेला आहे. धनभारित दोन प्रोटॉन आणि ऋणभारित दोन इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा अणू नियमानुसार पूर्णपणे उदासीन (भारविरहित) असतो. त्याचप्रमाणे हेलिअम वायू हा चवहीन, वासहीन आणि रंगहीनही असतो.




आपल्या सूर्यावर जी प्रक्रिया चालू असते त्यात सातत्याने हायड्रोजनच्या चार अणूंच्या संयोगापासून हेलिअम वायू एकीकडे बनत असतो तर दुसरीकडे याच प्रक्रियेतून अफाट उष्णता सूर्यामधून बाहेर पडत असते. प्रत्येक सेकंदाला सूर्याच्या अंतर्भागात ६२० कोटी मेट्रिक टन हायड्रोजनचे ६०६ कोटी मेट्रिक टन हेलिअममध्ये परिवर्तन होत असते आणि या अणुसंयोगातून सेकंदाला ३.८ ७ १०२६ ज्युल (हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बसारखे ६००० अणुबॉम्ब टाकल्यावर निर्माण होणारी ऊर्जा) इतकी उष्णता बाहेर पडत असते. अबब किती मोठे हे आकडे. हीच प्रचंड ऊर्जा आपल्या सूर्यमालेतील अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत आहे.
हेलिअम वायू हा उणे २६९ अंश सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत परिवर्तीत होतो. आणि हे द्रव अणुभट्टीमध्ये तयार होणारी उष्णता काढून घेण्यासाठी वापरले जाते. हेलिअमचे केंद्रक ‘अल्फा कण’ या नावाने अणुप्रक्रिया सुरू करण्यासाठी वापरले जाते. हेलिअम हा एम. आर. आय. (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज) या मशीनचे तापमान नियंत्रण करण्यासाठी शीतक-द्रव (कुलंट) म्हणून वापरले जाते.
पाणबुडे, स्कूबा डायिव्हग म्हणजेच खोल समुद्रात जाताना श्वसनासाठी ऑक्सिजनसह, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले सिलेंडर वापरले जातात.
नायट्रोजनच्या अपायाने ग्लानी येऊ नये म्हणून हेलिअमचा वापर होतो. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले हे सिलेंडर श्वसन-संस्थेच्या आजारावर वैद्यकीय क्षेत्रातही उपयोगी पडतात.
– डॉ. विद्यागौरी लेले
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
विद्वान कुषाण राजा कनिष्क
मूळच्या चीनमधील असलेल्या युह-ची या रानटी टोळ्यांपैकी कुषाण या समाजाच्या टोळ्यांनी आक्रमण करून वायव्य भारतात बराच मोठा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. भारतीय प्रदेशात आलेल्या परकीय आक्रमकांपैकी भारतीय संस्कृतीशी सर्वाधिक समरस झालेल्या कुषाणांचे वेगळे अस्तित्व नष्ट झाले.
कुषाण राजांपैकी कनिष्क याने इ.स. १२७ मध्ये पुरुषपूर म्हणजे सध्याचे पेशावर येथे आपली राजधानी करून, थोडय़ाच काळात काबूलपासून उत्तर प्रदेशातील बनारसपर्यंत आणि दक्षिणेत मध्य प्रदेशातील सांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. पुढे पेशावरऐवजी मथुरा हे त्याच्या सत्तेचे अधिक महत्त्वाचे केंद्र बनले. कनिष्काने आपल्या पूर्वजांनी स्वीकारलेल्या वैदिक धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अत्यंत हिंसक, रानटी अशा कुषाण टोळीचा आणि मंगोलियन वंशाचा हा सामथ्र्यवान राजा भारतीय जीवनशैली आणि भारतीय संस्कृतीत संपूर्णपणे समरस झाला हे अद्भुतच!
कनिष्काची नाणी तो किती भारतीय झाला हे दर्शवितात. सोन्याच्या आणि तांब्याच्या त्याच्या नाण्यांवर वेगवेगळ्या धर्मपंथांच्या देवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. शिव किंवा बुद्ध या भारतीय देवतांच्या प्रतिमा एका बाजूला तर स्वत: कनिष्क अग्नीला आहुती देताना नाण्यांच्या दुसऱ्या बाजूला दिसतो. भारतात अनेक ठिकाणी वापरात असणाऱ्या शक संवत्सराची सुरुवात कनिष्काने केली असल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे. इसवी सन ७८ मध्ये कनिष्काच्या राज्यारोहणाच्या मुहूर्तावर या संवताची सुरुवात झाली असे मानले जाते. परंतु याबाबतीत इतिहासकारांमध्येही मतभेद आहेत. याबाबतीत मतभेदांचा प्रमुख मुद्दा म्हणजे जर कुषाण राजा कनिष्काने हा संवत सुरू केला तर त्याला शकांच्या नावाने शक संवत असे नाव का दिले असावे? यावर दुसऱ्या इतिहासकारांचे उत्तर असे की कुषाणांना शकांवरील विजय मिळाला तेव्हापासूनच या संवत्सराची गणना सुरू झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शक संवत्सर हा कुषाणांचा शकांवरील विजय सुचवितो.
इ.स. ७८ मध्ये कनिष्काने राज्यारोहण केले असे काही इतिहासकारांचे म्हणणे होते, परंतु पुढच्या इतिहासकारांनी हे वर्ष चुकीचे असून कनिष्काचा राज्यकाल इ.स. १२७ ते इ.स. १४४ आहे असे प्रतिपादन केलेय.
– सुनीत पोतनीस