चिंचणीमधील विद्यार्थ्यांकडून पाच हजार वृक्ष लागवड आणि संगोपन

पालघर: डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एम.के. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्ष दत्तक योजनेंतर्गत केलेल्या  लागवडीत वृक्षांना बहर आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी  सुमारे पाच हजारपेक्षा अधिक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व देखभाल केली आहे. आज ही वृक्ष फळाफुलांनी बहरली आहेत.   गेल्या दहा वर्षांपासून प्राणवायू निर्मितीच्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले आहे.

निसर्ग संवर्धनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी प्रा. सुधीर भांडवलकर यांनी सन २०१० पासून अभिनव ‘ऑक्सिजन प्रकल्प’ सुरू केला. चिंचणी कनिष्ठ महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांंना त्यांच्या इच्छेप्रमाणे तसेच घराच्या अवतीभवती असणाऱ्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपटे देऊन  त्याची   देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

या झाडांची कशा प्रकारे प्रगती होत आहे त्यासाठी प्रत्येक झाडाचे प्रगती पुस्तक तयार करण्यास त्यांना सांगितले होते.  महाविद्यालयाच्या कार्यकाळात  झाडांविषयीची माहिती नियमितपणे प्रगती पुस्तकात नोंदवली जाऊ लागली.  त्या सोबतीला परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून या प्रकल्पाविषयी अभिप्राय नोंदवून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हे वृक्ष प्रेम जागृत झाले. त्यामुळे परिसरातील वृक्ष संख्येमध्ये या अभिनव प्रकल्पामुळे वाढ झाली.

या खेरीज प्रा. भांडवलकर यांनी वेगवेगळ्या फळांच्या बिया गोळा करून त्या डोंगर-दरी व निर्जन- ओसाड ठिकाणी टाकण्याचे प्रयोग विद्यार्थी व नागरिकांच्या प्रयत्नांनी केले. वृक्षरोपणासाठी विद्यार्थ्यांंची जनजागृती रॅलीचे अनेकदा आयोजन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून करोना पार्श्वभूमी वर वृक्ष लागवडीचे काम स्थगित राहिले असेल तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल काडय़ांचे वितरण तसेच गुळवेलाची लागवड करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले.

आंबा, पिंपळसह कोरफडची लागवड

घराच्या परिसरात उपलब्ध जागेवर गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांनी सुमारे पाच हजार झाडे लावली आहेत. त्यापैकी अनेक झाडांना फळ येऊ लागली आहेत. आंबा, फणस, चिकू, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू ही झाडे  घराजवळील अंगणात तसेच वड, पिंपळ, करंज, ताड ही झाडे सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याची रोपटे देण्यात आली. मुंबईच्या वनश्री फाउंडेशनच्या मदतीने ती उपलब्ध करुन देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ जागा नाही किंवा जे भाडय़ाच्या घरात राहतात अशा विद्यार्थ्यांंना कोरफड, सारटा, अक्कलकारा अशी कुंडय़ांमध्ये लागणारी औषधी  झाडे देण्यात आली.  झाडांचा औषधी गुणधर्म नागरिकांना अवगत करून देण्याचा या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला.