दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी तुंबले, शेतीच्या कामांना मात्र वेग

पालघर : शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवापर्यंत कायम राहिला. सलग दोन दिवस जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रविवारच्या सकाळी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने नागरी वस्तीमध्ये मालमत्तेचे नुकसान झाले. दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला पुन्हा वेग आला आहे.

मुसळधार पावसाने पालघरच्या ग्रामीण भागातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. जोरदार पावसाच्या संततधारेने सखल भागात पाणी साचल्याने अनेकांचा घरात पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्या, नाले दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. कोळगाव येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पालघर-बोईसर रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. पालघर पूर्वेकडील वीरेंद्र नगर परिसरात नागरिकांच्या घरात चार फुटांपर्यंत पाणी होते. पालघर शहरातील गोठणपूर, लोकमान्यनगर, मोहपाडा, डुंगी पाडा, घोलविरा, मणीनगर, कमला पार्क तसेच टेम्भोडे येथील फुलेनगर आदी भागांत रात्रीपासून घरामध्ये पाणी शिरले होते.

सफाळे रोडखड पाडा- नंदाडे या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने काही इमारतीमध्ये पाणी शिरले. येथील नागरिक गच्चीवर (टेरेस) बसून होते. स्थानिक नागरिक, सर्पमित्र संघटना व पोलिसांच्या मदतीने ७० ते ८० नागरिकांना सुखरूप स्थळी हलवले. माहीम रस्त्यावरील पाणेरी नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी भरल्याने या ठिकाणाहून माहीम, केळवे, मधुकरनगर, दांडा-खटाळी, भादवे, उसरणी, एडवण, कोरे, दातिवरे या भागांतील वाहतूक कोलमडली होती. सफाळेजवळील मांडे या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला.

बोईसर पूर्व पट्टय़ातील बेटेगाव चौकीनजीकचा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक काही काळ बंद झाली होती. याचबरोबरीने नागझरी पूलही पाण्याखाली गेल्याने या पुलाचा संपर्क सुटला होता. गुंदले येथेही मोठय़ा प्रमाणात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे पाहावयास मिळाले. सफाळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने किराणा, इलेक्ट्रॉनिक व कपडय़ाच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असले तरी कुठेही जीवितहानी झाल्याची घटना घडलेली नाही. पश्चिम रेल्वेच्या पालघर, बोईसर तसेच विरार आदी ठिकाणी रेल्वे रुळावर पहाटेपासून पाणी भरल्याने पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत रेल्वे सेवा ठप्प होती.

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  त्यांनी शेतीच्या कामाला पुन्हा सुरूवात केली असून जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.