पालघर: पालघर तालुक्यातील केळवा पर्यटनस्थळी २४ मे रोजी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अन्य एका रिसॉर्टवर आज दुपारी एका अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाला आहे. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

केळवे (राखाडे) येथील राऊत रेसिडेन्सी नामक एका हॉटेलमध्ये आलेल्या बोईसर येथील एक प्रेमी जोडप्यांमध्ये वाद होऊन हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. बोईसर येथे राहणारी एका अल्पवयीन मुलीवर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या मुलीच्या मानेच्या भागात पिस्तुलीची गोळी लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला होता. तिला उपचारासाठी माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून दुपारी एक ते दीडच्या दरम्यान आणण्यात आले होते. तेथून तिला पालघर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र पिस्तूल ची गोळी तरुणीच्या माने लगतच्या भागात अडकल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या तरुणीची प्रकृती खालावत असल्याने तिला बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात हलविण्यात येऊन शस्त्रक्रिया सुरू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालघर बोईसर परिसरात मोकळेपणाने बंदुकी व शस्त्र उपलब्ध होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

केळवे येथील गैरप्रकारांना पुष्टी

काही दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणीच्या मृत्यूप्रसंगी मयत व्यक्ती फ्राईड राईस खात असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची सबब पुढे करून सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते. मात्र १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला रिसॉर्ट मध्ये प्रियकराबरोबर राहण्याची अनुमती दिली गेल्याने केळवा येथे वेशाव्यवसाय व अनैतिक संबंधांना खतपाणी देण्याची व्यवस्था उभारण्यात आल्याबद्दल होत असलेल्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. पालघर येथे नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असे सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना तंबी दिली होती. मात्र ते रुजू झाल्यानंतर आठवड्याभरातच ही घटना घडल्याने आगामी काळात पोलिसांकडून केळवा व इतर पर्यटन ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना केल्या जातील अशी शक्यता आहे.

या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याशी संपर्क साधला केळवे राखाडे येथील राऊत रेसिडेन्सी या हॉटेल मध्ये झालेला गोळीबारात जखमी असणाऱ्या मुलीने आपला प्रियकर शौचालयात गेला असता तिने त्याच्या बॅग मधील पिस्तूल काढून स्वतःहून आपल्या मानेवर गोळीबार केल्याची माहिती तिने उपचारासाठी बोईसर येथे हलवण्यात येत असताना पोलिसांना दिली असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणात दिनेश धोडी (दांडीपाडा, बोईसर) या तरुणीचा मित्र व पिस्तूल केळवा सागरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वादावादीतून झाला गोळीबार ?

केळवे येथील हॉटेलमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या तरुणीवर बोईसर जवळील अधिकारी लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी भेट देऊन जखमी तरुणीच्या तब्येतीबाबत माहिती घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या प्रेमी जोडप्या मध्ये वाद झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाल्याची माहिती पुढे येत असून गोळीबार करणारी व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याबाबत ची माहिती या मुलीच्या पालकांनी पत्रकारांना दिली. मुळात शस्त्र परवाना नसताना पिस्तूल घेऊन प्रेयसी बरोबर रिसॉर्टवर जाण्याचा हेतू संशयास्पद असून घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी पुढे आली आहे.