पालघर: महाराष्ट्र दिनी पालघर जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” हे विशेष स्वच्छता अभियान पालकमंत्री यांच्या हस्ते राबवले जाणार आहे. या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” हे विशेष स्वच्छता अभियान १ मे २०२५ पासून राबवले जाणार आहे. या अभियानाचा भव्य शुभारंभ कोळगाव येथे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान प्रभावीपणे राबवले जाणार असून पूर्वतयारी अंतर्गत २७ ते ३० एप्रिल दरम्यान घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, २९-३० एप्रिलला प्रचारप्रसार तसेच १ ते १० मे दरम्यान संकलित ओल्या कचऱ्याचे नाडेप खड्ड्यात भराव व १५ सप्टेंबरपर्यंत खत निर्मितीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

ग्रामीण भागात ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती या उद्देशाने हे अभियान सर्वत्र राबविण्यात येत आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी “स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ग्रामस्थांनी नियोजनबद्ध वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे. या अभियानात प्रत्येक ग्रामस्थाने सक्रिय सहभाग घ्यावा.” असे आवाहन केले आहे.

तालुका व गट पातळीवर अधिकारी, समन्वयक व स्थानिक प्रतिनिधी यांचा सहभाग असून ग्रामपंचायतींनी बैठका घेऊन नागरिकांपर्यंत मोहीमेची माहिती पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अभियानात प्रत्येक कुटुंबाने ओला व सुका कचरा वेगळा करावा व स्वच्छ गावासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मनोज रानडे अधिकारी यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत गावांगावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरुपी स्वच्छ ठेवावे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू ” हे अभियान १ मे पासून सुरु होत आहे. तरी या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व आपले गाव स्वच्छ ठेवावे.- गुलाबराव पाटील, मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता,महाराष्ट्र राज्य