पालघर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पालघर जिल्ह्यात विठ्ठल भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सकाळपासून पावसाळी वातावरण असतानाही, भाविकांनी जिल्ह्यातील श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दिवसभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमामुळे व सुट्टीच्या दिवसामुळे मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची रेलचेल सुरू राहणे अपेक्षित आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वालिव, विरार, पालघर, केळवे, कुंभावली आणि वाडा (तिळसा) येथील प्रमुख विठ्ठल-रुक्माई मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी हजेरी लावली होती. पालघर जिल्ह्यातील प्रमुख विठ्ठल-रुक्माई मंदिरांमध्ये सकाळी अभिषेक आणि आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुपारनंतर प्रवचन, कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विठ्ठल नामाच्या गजराने मंदिरे आणि परिसर दुमदुमून गेला आहे.
अनेक ठिकाणी उपवासाच्या पदार्थांचे व फळ वाटप आणि अन्नदान देखील केले जात आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लहान-मोठ्या दिंड्या काढण्यात येत आहेत. यामध्ये भाविक पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘विठूनामाचा’ जयघोष करत सहभागी होत आहेत.
शाळांमध्येही आषाढी एकादशीचा उत्साह
आषाढी एकादशीचा उत्साह केवळ मंदिरांपुरता मर्यादित नसून जिल्ह्याभरातील शाळांमध्येही तो मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडी, मिरवणुका आणि रिंगण करत आषाढी एकादशी साजरी केली. चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्माईच्या वेशात केलेल्या दिंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्त चिमुकल्यांनी विविध संदेश नागरिकांपर्यंत पोचवले आहेत.
आषाढी आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
आषाढी यात्रा आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालघर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. पोलीस दल आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, नागरिकांना शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.