पालघर: बोईसर येथील ग्रामीण रुग्णालय सुरू असलेले ठिकाण अर्थात पूर्वीचे टीमा हॉस्पिटलची जागा हॉस्पिटलच्या धर्मदाय संस्थेला पुन्हा मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नांसंदर्भात बोईसरच्या विविध पक्षातील नेत्यांनी पालघरच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सुरू असलेले ग्रामीण रुग्णालय बोईसर येथे पर्यायी व्यवस्था उभी राहीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली. सध्याची मान्सून परिस्थिती व शहरी भागात करोनाचा झालेला शिरकाव पाहता रुग्णालयाची सद्यस्थिती कायम ठेवण्या संदर्भात सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
टीमा हॉस्पिटल व्यवस्थापनाने करोना काळात जिल्हा शल्य चिकित्सक यांना कोविड रुग्णालय उभारण्यासाठी दिलेली वास्तू आपल्याला परत मिळावी अशी मागणी अनेकदा केली होती. तसेच गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्या ठिकाणी बोईसर ग्रामीण रुग्णालय सुरू असल्याने आपल्याला प्रति महिना १० लाख रुपयांचे भाडे मिळावे अशी मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
या संदर्भात बोईसर येथील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाला परिसरातील नागरिक व कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सुरू झालेल्या पावसाळ्यात या औद्योगिक परिसराला या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले. विंचू तसेच सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना या रुग्णालयातून तातडीने उपचार मिळत असून हे रुग्णालय कुरगाव, तारापूर, दांडी किंवा अन्य ठिकाणी हलविल्यास नागरिकाला मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
याप्रसंगी संजय पाटील, जगदीश धोडी, महेंद्र भोणे, समीर मोरे, भावेश चुरी, सचिन लोखंडे, अविश राऊत, परशुराम चावरे व बोईसर येथील अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा भूमी अभिलेख नरेंद्र पाटील, एमआयडीसी चे उपभियंता अविनाश संखे व इतर सहकारी उपस्थित होते.
बोईसर येथील संजय नगर परिसरात दीड एकर उपलब्ध जमिनीवर शासकीय रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी निधी मंजुर झाला आहे. या रुग्णालयाच्या वास्तूची उभारणी सध्या निविदा स्तरावर असून दीड वर्षात इमारत उभी राहू शकेल असे शल्य चिकित्सक यांनी सांगितले. दरम्यान टीमा रुग्णालयासाठी एमआयडीसी ने नाममात्र दराने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याचा वाणिज्य वापर करीत असल्याचे आढळल्यास जमीन वाटप करारनामा रद्द करण्यासाठी आपण प्रस्तावित करू अशी भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतली. एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी ही जागा रुग्णालय व्यवस्थापनाला देताना नमूद केलेल्या अटी शर्तींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना सूचित केले.
टीमा रुग्णालयाच्या सद्यस्थितीला कायम ठेवण्याचे आदेश देताना या रुग्णालयाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी आरोग्य, एमआयडीसी, महसूल या विभागांसह इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित करून या प्रश्नावर अभ्यास करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी नंतर भेटण्यात आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले. आपण सुरू असलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी तसेच प्रस्तावित नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणाला भेट देऊ असे त्या पुढे म्हणाल्या.
करोनाच्या दृष्टीने पूर्वतयारी
करोना चे शहरी भागात होणारे संक्रमण पाहता पालघर जिल्ह्यातील शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत येणाऱ्या १२ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्या संदर्भात सूचना सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी लोकसत्ता ला दिली. तसेच करोना संदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करून चाचणी नमुने तपासणीसाठी डहाणू अथवा मुंबई येथील करोना तपासणी केंद्रांमध्ये पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत करोनाचे रुग्ण पालघर मध्ये आढळले नसले तरी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्या दृष्टीने संवेदनशील करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.