पालघर: मनोर-वाडा-भिवंडी राज्य मार्गावर मनोर जवळ टेन-करळगाव दरम्यान असणाऱ्या पुलाच्या कठडा (पॅरापिट वॉल) कमकुवत झाल्याने मनोर ते वाडा दरम्यानची अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली असून या पुलावरील डांबराचे अतिरिक्त थर काढून टाकून व कठड्याला प्लम्ब काँक्रीटद्वारे दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून हलक्या वाहनांना नदीपात्रात जुन्या पुलावरून तयार करण्यात येणाऱ्या पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे.

गेल्या वर्ष दीड- दोन वर्षापासून राज्यमार्ग ३४ वरील टेन गावाजवळील देहेर्जा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच या पुलावरून अवजड वाहतूक होताना पूल धोकादायक झाल्याचे जाणवत होते. या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. या पुलाला अवजड वाहन आदळल्याने कठडा तुटल्याचे काल सायंकाळी उशिरा सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काल रात्री उशिराने पुलाची पाहणी करून अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून बंद केली होती.

हेही वाचा – वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

या पुलाची तज्ज्ञांमार्फत आज सकाळी तपासणी करण्यात आली. यावेळी १५०० पेक्षा अधिक पुलांची पाहणी दुरुस्ती करणारे पूल तज्ञ विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उप अभियंता हेमंत भोईर व इतर सहकारी उपस्थित होते.

कंस (आर्क) पद्धतीच्या या पुलाची रचना ७०-७५ वर्षांपूर्वी झाली असून या पुलाच्या कंस भाग सुरक्षित व सुस्थितीत असलयाचे तज्ञांनी मत मांडले. मात्र पुलाचा कठडा व त्याखालील बांधकाम रचना कमकुवत झाल्याचे दिसून आल्याने संपूर्ण कठड्याची दुरुस्ती करण्याचे प्रास्तावित करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून पुलावरील पृष्ठभागाच्या झालेल्या दुरुस्तीमुळे पुलाचा थर प्रमाणापेक्षा अधिक जाड झाला असून या दुरुस्ती कालावधी दरम्यान अतिरिक्त असणाऱ्या डांबरी थराचा भाग काढून टाकण्यात येणार असल्याचे तज्ञ समितीने पत्रकारांना माहिती दिली. या दृष्टिकोनातून दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात येणार असून पावसाळ्यापूर्वी या पुलावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विक्रमगड फाटा येथे पुलाचे काम सुरू झाल्याने त्या परिसरात देखील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. टेन जवळील पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून वळविण्यात आले आहे.

कशी असेल पर्यायी व्यवस्था

गुजरातवरून येणारी अवजड वाहने शिडसाड, पारोळ मार्गे अंबाडी, भिवंडी किंवा चिंचोटी, कामन मार्गे भिवंडी अशा पद्धतीने वळवण्याचे प्रस्तावित आहे. तर भिवंडी येथून गुजरात दिशेने जाणारे अवजड वाहने वाडा, पाली मार्गे विक्रमगड व पुढे कासा, चारोटी मार्गे महामार्ग असे वळविण्यात येणार आहेत.

हलक्या वाहनांसाठी व्यवस्था

या दुरुस्तीच्या कामादरम्यान पुलावरील अंथरलेल्या डांबर-खडीचे थर काढणे व कठड्याची दुरुस्ती करणे अशी कामे असल्याने या पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे शक्य राहणार नाही. हलक्या वाहनांसाठी नदीपात्रात असणाऱ्या जुन्या पुराची करून त्यावरून वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

हेही वाचा – गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

खड्ड्यांमुळे समस्या नाही

या पुलावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. त्यावरून अवजड वाहतूक होताना पुलावर धक्के बसत असत. मात्र या खड्ड्यांमुळे पुलाची दुरावस्था झाली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने तसेच तज्ञ यांनी स्पष्ट केले.

काँक्रिटी करण्यादरम्यान पुलाची देखभाल दुरुस्ती

मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याच्या कामासाठी १५०० कोटी रुपयांची मंजुरी राज्य शासनाने दिली असून या कामादरम्यान या मार्गावरील पुलांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास काही ठिकाणी नवीन पुलांची उभारणी करण्याची येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

वनविभागाचा ताब्यात असलेल्या जमिनीचे भूसंपादन होऊ न शकल्याने टेन-करळगाव दरम्यान या पुलाशेजारी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले. या काँक्रीटीकरण्याच्या कामादरम्यान हा प्रश्न देखील मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.