पालघर : पालघर जिल्ह्यात प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असून त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार असल्याचा निर्णय आपण घेतल्याची माहिती पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला ११ वर्ष पूर्ण होत असल्याने त्यासंदर्भात त्यांच्या कामाचा आढावा तसेच देशात झालेले बदल याविषयी माहिती देण्यासाठी मनोर येथे भाजपातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गणेश नाईक यांनी गेल्या ११ वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, उद्योगांचे प्रतिनिधी, प्रदूषणामुळे बाधित होणाऱ्या भागातील प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात येणार आहे. याच बरोबरीने या समितीत तालुकानिहाय पत्रकारांचा समावेश देखील करण्यात येईल अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.
कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची अवहेलना होणार नाही, त्यांना कोणत्याही लोकप्रतिनिधी अपमानित करणार नाही याची खबरदारी घेताना बेजबाबदार, भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही असे गणेश नाईक यांनी सांगितले. प्रशासकीय बाबींची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करताना घटना व नियमांच्या चौकटीत बसून कारभार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मे महिन्यात झालेल्या वादळी परिस्थितीमुळे डहाणू येथील काही बोटिंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना अशाप्रसंगी बोट मालकांना तूटपुंज मदत केल्याचे पत्रकाराने निदर्शनास आणून दिले. याबाबत राज्य शासनाकडून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याने मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण उपस्थित करू असे गणेश नाईक यांनी सांगितले. याच वादळी परिस्थितीत वसई तालुक्यातील सुक्या मच्छीचे नुकसान झाल्याचा मुद्दा आपण शासनापर्यंत प्रभावीपणे मांडला असून या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांकडून मार्गीकेचे पालन केले जात नसल्याचे पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचे गणेश नाईक यांनी उत्तर देताना सांगितले. जिल्हा पोलिसांकडून या प्रकरणात लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून महामार्गावरील वाहतुकीच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल केला जाण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
एकीकडे गेल्या ११ वर्षात देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात शीघ्र गतीने विकसित झाल्याचा दावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेच्या आरंभी व्यक्त केला असता जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीला ओएफसी द्वारे अतिजलद गतीने इंटरनेट सुविधा पुरवण्याची योजना आजवर कार्यरत न झाल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान रक्कम जमा करण्याच्या डीबीटी योजनेबद्दल केंद्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करणाऱ्या गणेश नाईक यांना मुंबई बडोदा द्रुतगती मार्ग व इतर राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनात लाभार्थ्यांकडून पैसे लाटण्याच्या कथित प्रकारांबद्दल विचारणा केली असता त्यांनी या दोन्ही प्रश्नाला बगल देण्याचे पसंत केले.
जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच वारली हाट सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आवश्यक निधी मिळावा यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे गणेश नाईक यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
शेतात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास अनुदान देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव मांडणार
जंगलामध्ये वावर करताना वाघ किंवा इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला २५ लाख रुपये देण्याची वनविभागाची तरतूद आहे. मात्र शेतामध्ये काम करताना सर्पदंश झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतेही अनुदान नाही याकडे आपले लक्ष काही शेतकऱ्यांनी वेधले होते. कोणत्याही मृत्यूचे मूल्यांकन करणे योग्य नसल्याचे सांगत शेतात किंवा जंगलात कोणाचाही मृत्यू झाल्यास समान पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी अशी आपली भावना असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. या प्रकरणात आपण कृषी विभागाला मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडण्याची विनंती केली असून याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.