पालघर : राज्य सरकारमधील काही मंत्री तसेच राजकारणातील काही मंडळी यांचे हात बरबटलेले असल्याचे आरोप करत अशा माखलेल्या मंडळींचे बुरखे फाडले गेले पाहिजे असे स्पष्ट मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले. राज्य सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचेसांगितले जात असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे

विक्रमगड येथे जिल्ह्यातील चौथा जनता दरबार च्या आरंभी नागरिकांना संबोधन करताना गणेश नाईक यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोळे, आमदार राजेंद्र गावित तसेच जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अधिकारी वर्गाला पूर्वग्रह ठेवून बदनाम करण्यात येऊ नये असे सांगताना मंत्री अथवा लोकप्रतिनिधी यांच्याकडून बेकायदेशीर कामांची शिफारस झाल्यास त्यावर कागदोपत्री पूर्तता करण्याचा शेरा करून प्रकरण पुनरालोकन करण्यासाठी पुन्हा कनिष्ठ पातळीवर पाठवले पाहिजे असे सांगितले. लोकाभिमुख कार्यभार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी विक्रमगड येथील जनता दरबार प्रसंगी सांगितले.

काही पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच समाजसेवेचा बुरखा पांघरून ब्लॅकमेलिंग करणारी मंडळी सध्या वावरत असून लोकाभिमुख कारभार करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आपल्याला खुर्ची, सत्ता , पैसा, पॉवर इत्यादी बाबींचा मोह नसून ठाणे जिल्ह्यात आपल्या श्रेणीचा (रेंज) नेता नसल्याचे त्यांनी सांगत पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अप्रत्यक्षपणे तोफ डागली.

गेल्या आठवड्यात आपला ७५वा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केल्याचा उल्लेख करत लोकसेवेत वय हे महत्त्वाचं नसते असे गणेश नाईक यांनी ठणकावून सांगितले. अनेक अधिकारी, राजकीय मंडळी वयाने तरुण असली तरी मनाने थकलेली असल्याने त्यांच्याकडून अपेक्षित काम होत असल्याचे सांगत या वयात देखील आपल्यातील काम करण्याची उमेद कायम असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.