वाडा : कोसबाड येथील हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे.

वाडा तालुक्यात आज (१९ जुन) पावसाने जोरदार हजेरी लावली. वाडा, खानिवली, पालसई, गोऱ्हे, कुडूस, डाकिवली या भागात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पहाटे ५ वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. काही शाळांनी तर पावसाचा सातत्याने वाढणारा जोर पाहून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळेला, खाजगी शिकवणीला सुट्टी देण्यात आली.

सकाळी १० वाजता शासकीय यंत्रणेकडून पुढील ३ तासांत पालघरमध्ये ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सूचनांचे पालन करावे तसेच २० व २१ जुन रोजी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असा संदेश देण्यात आला.

मागील दोन दिवसांपूर्वी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. १६ जुन रोजी पावसाचे खऱ्या अर्थाने आगमन झाले. तर १८ जुन रात्री ८ वाजल्यापासून विजांचा कडकडाट होत पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून महावितरणकडून विद्युत वीज पुरवठा काही काळ खंडित करून पुन्हा सुरळीत करण्यात आला होता.

वाडा शहरासह तालुक्यात पुन्हा गुरुवार, १९ जुन पहाटे ५ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावत वेग पकडला. मुसळधार पाऊस होत असल्याने चाकरमानी, शालेय विद्यार्थ्यांना मात्र मोठा फटका बसला. अधून मधून विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने इंटरनेट सेवा, शासकीय कार्यालयातील सेवा, टपाल सेवा, वैद्यकीय सेवा, बँक सेवा, मोबाईल सेवा ठप्प होत आहेत.

यावेळी वाडा शहरातील पंचायत समिती व जिल्हा परिषद शाळेसमोरील तसेच मंगलपार्क, शास्त्री नगर येथील रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर वाडा शहरास कुडूस, खुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसून आले.

शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणीचे संकट

मधल्या काळात पाऊस पडल्याने ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी भात पेरण्या केल्या आहेत. मुसळधार पावसाने झोडपल्याने तसेच शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे पेरण्या देखील मुसळधार पावसामुळे वाया गेल्या आहे. शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणी करण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असुन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

वाडा – कुडूस- भिवंडी महामार्गावरील नेहरोली येथील रस्ता खचला.

वाडा – कुडूस – भिवंडी या महामार्गाचे एका बाजूचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या निकृष्ट झालेल्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. खोदाई करताना दुसऱ्या बाजूला धक्का बसला आहे, त्यातच मुसळधार पाऊस सुरू असुन त्यावरून अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने रस्ता खचला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवासासाठी धोकदायक झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्याकडून ठोस उपायोजना करण्यात दुर्लक्ष होत आहे.

हा रस्ता निकृष्ट झाला असुन खड्डे पडले आहेत. त्यातच रस्ता खचल्याने एकेरी मार्गावर दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली असुन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहने जेमतेम हालत असल्याचे सांगितले जात आहे

पावसाचा जोर कायम असल्याने “वाडा – कुडूस – अंबाडी – भिवंडी” मार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्याने अनेक वाहने आदळत आहेत. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एसटी बसमधील प्रवाशांना वाडा येथून अंबाडी हे २४ किमी अंतर पार करण्यासाठी ५ तास तर वाडा – भिवंडी हे ४४ किमी अंतरासाठी ८ तास तासांहून अधिक वेळ लागला असल्याचे प्रवाशांनी समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान वाहन चालकांना, प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे.

आधीच मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच वाडा – कुडूस रस्ता खचल्याने नागरिकांना आता रस्ता दुरुस्ती होईपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तातडीने सुस्थितीत करण्याची मागणी केली जात आहे.

एक बाजूने स्लॅब ड्रेन बांधत असताना मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह आल्याने तेथील जुन्या बांधकामातील पाईप मधून पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने रस्ता तुटलेला आहे.दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेवर बांधण्यात आलेल्या स्लॅब ड्रेनवरून (छोट्या पुला) वाहतूक वळविण्यात आली आहे. – पोपटराव चव्हाण, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर.

पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर

  • आज १९ जून रोजी तूरळक ठिकाणी अत्यंत जोरदार ( २०४ मिमी पेक्षा जास्त पाऊस) आणि इतर सर्व भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे
  • २० ते २३ जून दरम्यान सुद्धा पावसाचा जोर कायम राहील व तूरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, आणि इतर सर्व भागातही मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे

कृषि सल्ला

पुढील ३ – ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने भात रोपवाटिकेची पेरणी व फळ झाडे लागवड पुढे ढकलण्यात यावी. आंबा व नारळ यासारख्या फळबागेला खते देण्याची कामेही पुढे ढकलावीत. आज रेड अलर्ट देण्यात आले असल्याने घराबाहेर जाणे टाळावे. – जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, जिल्हा – पालघर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.