डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कळमदेवी परिसरातील रायपूर येथील एका शेतकऱ्याचा रविवार २८ सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायपूर येथील रहिवासी सदानंद भुरभुरा (वय ५५) हे रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत होते. त्यावेळी मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला होता. नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय घसरला व ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सोमवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी कळमदेवी येथील शिलोंडा ग्रामपंचायत हद्दीत नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.