पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या घोडबंदर ते तलासरी या दरम्यान नव्याने केलेल्या काँक्रिट रस्त्याची अत्यंत खराब व धोकादायक स्थिती लक्षात घेता पालघर चे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती करणारे निवेदन दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील संपूर्ण भागावर काँक्रिटीकरण केले. काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच गेल्या वर्षी झालेले काँक्रीट रस्त्याची भाग उखडून त्यावर खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरणाचा पृष्ठभाग पावसाळ्यापूर्वीच उखडून गेल्याने त्यावर एपॉक्सी रेजिन व मास्ट्रिक अस्फाल्ट चे थर अंथरल्याने रस्त्याची पातळी राखली गेली नाही.
यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झाले असेल हा महामार्ग धोकादायक झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दररोज हजारो वाहनचालक, विद्यार्थी व नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्याची ही परिस्थिती अपघातांना कारणीभूत ठरत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी घोडबंदर ते तलासरी रस्त्याचे तात्काळ पुनर्भरण (Resurfacing) करणे, रस्त्याच्या कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण (Technical Audit) करणे, दोषी ठेकेदार व अंमलबजावणी यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे, नियमित देखभाल व खड्डे तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी केली. यासोबतच, खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी खानिवडे (वसई) व आंबोली (तलासरी) या गावांमध्ये महामार्ग ओलांडताना होणाऱ्या धोक्यामुळे, प्रत्येकी एक पादचारी फुल (फूटओव्हर ब्रिज) मंजूर करून त्याचे तातडीने बांधकाम सुरू करण्याचीही मागणी केली आहे. या मागण्यांवर त्वरित प्रतिसाद देत, मा. नितीन गडकरी यांनी या मागण्या मान्य करून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे.
“ही कामे पूर्ण झाली तर स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. त्याचबरोबर एन एच -४८ वरील अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटेल.”- खासदार डॉ. हेमंत सवरा, पालघर