Ganesh Visarjan 2025: पालघर : अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील ३६९ सार्वजनिक आणि ७५२ खाजगी गणपतींचे विसर्जन आज पार पडणार आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. पावसाने रस्त्यांची दुरवस्था केली असली तरी विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
पालघर नगर परिषदेने विसर्जनस्थळी चोख व्यवस्था केली आहे. गणेशकुंड येथे तीन नवली तलावावर दोन आणि अल्याळी तलावावर एक असे एकूण ६ निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच विसर्जनासाठी दोन ते तीन क्रेनची सोयही करण्यात आली आहे. पालघर येथील गणेश कुंडावर, मासवण येथील सूर्या नदीवर व नवली येथील तलावाच्या ठिकाणी विसर्जनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशकुंड येथे मंडप उभारण्यात येणार असून नगरपरिषदेचे कर्मचारी विसर्जन प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अपघात टाळण्यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. पालघर नगर परिषदेने तलावात छोट्या होड्यांची व्यवस्था केली असून त्यातून गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. आज सायंकाळी चार वाजल्यापासून पालघर शहरासह जिल्हाभरातील गावांमध्ये व शहरांमध्ये गणरायाच्या विसर्जनास सुरुवात होणार असून, रात्री उशिरापर्यंत मिरवणुका विसर्जनस्थळी पोहोचणार असल्याने पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था सज्ज झाले आहेत.
खड्डेमय रस्ते आणि पावसाचे आव्हान
यंदाच्या गणेशोत्सवात पावसाने अनेक रस्त्यांची दुर्दशा केली आहे. पालघर शहरातल्या विसर्जन मार्गांवर खड्डे बुजवण्यासाठी खडी टाकण्यात आली होती, मात्र ती वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे बाहेर निघून रस्त्यावर पसरली आहे. यामुळे दुचाकीस्वारांना अडचणी येत आहेत. यंदा या खड्डेमय रस्त्यांचे विघ्न पार करीत गणेशभक्तांना मिरवणुका काढाव्या लागणार आहेत. यासोबत गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विसर्जना दरम्यान पावसाने विश्रांती घेण्याची इच्छा भाविक व्यक्त करीत आहेत.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
अनंत चतुर्दशीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, ६७ पोलीस अधिकारी, ७३२ पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड, ५० वाहतूक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात ठिकठिकाणी चौकांवर व मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.
मनोर येथे वाहतुकीचे नियोजन
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोर बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत मस्ताननाकाकडून चहाडे नाक्याकडे येणाऱ्या सर्व जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक सेवांतील वाहनांना मात्र यात सूट देण्यात आली आहे.
दान आणि संकलन केंद्र
पालघर येथे वसंतराव नाईक चौक (ऑर्चिड हॉल जवळ) आणि नवली समाज मंदिर येथे गणेश मूर्ती दान व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवर मूर्ती आणि निर्माल्य स्वीकारून त्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन केले जाईल. या केंद्रांवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, आवश्यक सोयीसुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.
पावसामुळे खड्डे बुजविण्यास अडचणी
गेल्या काही महिन्या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असून विसर्जनाच्या अनुषंगाने नगर परिषदेकडून विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खडी व माती टाकून जेसीबीच्या साह्याने आज सकाळपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती मात्र गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे अडचणी येत होत्या.
पालघर आणि बोईसरमध्ये वाहतूक मार्गात बदल
गणपती विसर्जन चुकीच्या अनुषंगाने पालघर आणि बोईसर शहरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद असेल. मनोर आणि बोईसरहून पालघर शहरात येणारी तसेच, तारापूर आणि पालघरकडून बोईसरमध्ये येणारी मोठी वाहने वळवण्यात येणार आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.