पालघर : आधीच खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त असलेल्या पालघरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सध्या शहरात सुरू आहे. शहरातील मुख्य वाहतुकीचा सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता केबल टाकण्यासाठी बेदरकारपणे खोदला जात आहेत. यामुळे नागरिकांचा संताप वाढला असून प्रशासन नक्की काय साध्य करू पाहत आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासूनच पालघर शहरातील सर्वच मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर देखील नगरपरिषद व जिल्हाप्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने नागरिक निराश आहेत. यासह एकीकडे प्रशासन वर्षानुवर्षे खड्डे बुजवत नसताना दुसरीकडे चांगल्या रस्त्यांचीही वाट लावली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बुधवारी पालघर नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडून पालघर माहीम मार्गवरील कमला पार्क परिसरातील मुख्य रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदण्यात येत असलेल्या लांब पट्ट्यामुळे नागरिकांचा आक्रोश उफाळत आहे.
पालघर शहरात नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना योग्य नियोजन केले गेले नसल्याचे दिसून येत आहे. या अगोदर पालघर बोईसर या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बोईसर दिशेकडे केबल टाकण्याच्या कामासाठी महावितरण कडून रस्त्याच्या कडेचा रस्ता खोदण्यात आला होता. केबल टाकण्याच्या कामानंतर हे खड्डे बुजविण्यात आले असले तरीही योग्य प्रकारे न बसविल्या गेल्याने उंचवटे तयार झाले आहेत. तसेच सुस्थितीतला रस्ता देखील वाहतुकीसाठी धोकादाय झाला होता.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. खोदलेला रस्ता डांबरी असताना तो बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट-काँक्रीटचा पॅच मारला जात आहे. या निकृष्ट कामामुळे भविष्यात याच ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे पडणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. खोदलेल्या रस्त्यांची योग्य दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा कामांसाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे. तर पालघरकरांसाठी अजून एक नवीन खड्डा तयार होत असल्याच्या उपहासात्मक शुभेच्छा पालघरकर एकमेकांना देत आहेत.
याबाबत पालघर नगरपरिषदेचे अभियंता विपुल कोरफड यांच्याशी संपर्क साधला असता विद्युत विभागाकडून हे काम करण्यात आले असून कामानंतर रस्त्याचा तो भाग बुजविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरातील अनेक भागांत दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. नागरिकांना याच खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याकडे अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव आहे. याच परिस्थितीत, आता चांगल्या रस्त्यांची दुर्दशा केली जात आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करून विकासकामांच्या नावाखाली शहराची आणखी दुरवस्था केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आम्ही अनेक वर्षांपासून खड्डे बुजवा, अशी मागणी करत आहोत. पण प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. आता असलेले चांगले रस्तेही खोदून, पुन्हा खड्डेच निर्माण केले जात आहेत. हा प्रशासनाचा नेमका कोणता कारभार आहे? या मनमानी कारभाराला वेळीच आळा घातला नाही तर, पालघरची वाटचाल खड्डेमुक्त शहराऐवजी ‘खड्डेमय शहर’ म्हणून होईल हिमांशू राऊत, सामाजिक कार्यकर्ता
