पालघर : पालघर नगर परिषदेच्या आगामी काळात होणारी सार्वत्रिक निवडणुक सत्ताधारी पक्षांमध्ये अतीतटीची होण्याची शक्यता असून प्रारूप मतदार यादी मध्ये असणाऱ्या त्रुटीबाबत सुमारे ११५० अर्ज स्वीकारण्यात आले असून त्या अनुषंगाने किमान २२९० मतदारांचे प्रभाग बदलल्याचे दिसून आले आहे. नगरपरिषद हद्दीमधील १५ प्रभागांपैकी १० प्रभागांमध्ये १०० पेक्षा अधिकाने मतदार संख्या बदलली असून निवडणूक निकालात ही बाब निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये ५५,७२७ मतदार असून त्यामध्ये २९२८२ पुरुष, २६४४३ महिला व दोन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. लोकसंख्येचा आधार घेऊन पालघर नगर परिषदेमध्ये प्रत्येकी दोन सदस्य असणाऱ्या १५ प्रभागांची रचना मंजूर करण्यात आली असून त्यासंदर्भात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या तपशीला बाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १७ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती.

पालघर शहरातील प्रारूप मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवून बदल सुचविणारे ४५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये अधिकतर अर्जदाराने आपले नाव राहत्या ठिकाणा ऐवजी दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचे अर्जात नमूद केले होते. या प्रारूप मतदार यादीत काही मयत व्यक्तींची नावे, दुबार नावे, पत्ता उल्लेखित नसलेली नावे, पालघर शहराबाहेरील पत्ता असणारी नावे चुकीच्या प्रभागामध्ये नमूद करण्यात आले होते.

नागरिकांनी राजकीय पक्षाने नोंदवलेल्या आक्षेपांची पालघरच्या मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पडताळणी करून याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार मतदार यादी मध्ये बदल केले. प्राप्त असणाऱ्या साडेचार हजार अर्जांपैकी सुमारे ११४५ अर्जांचा विचार केल्याने मतदार यादीत प्रत्यक्षात २२९० बदल झाल्याचे दिसून आले आहे.

शहरातील १५ प्रभागांपैकी सात ठिकाणी मतदार संख्या प्रारूप यादीच्या तुलनेत कमी झाली असून प्रभाग ८ (अल्याळी, गणेश नगर टेंभोडे, हावरे) मध्ये तब्बल ३६३ मतदार संख्या कमी झाली आहे. तसेच प्रभाग ११ मध्ये (सावरकर चौक, नाना नानी पार्क, विष्णू नगर) १९४ मतदार तर प्रभाग १३ मध्ये (शुक्ला कंपाउंड, आर्यन शाळा, प्रकाश टॉकीज) १७९ मतदारांची घट झाली आहे. याखेरीज प्रभाग ३ (सेंट जॉन महाविद्यालय, हनुमान टेकडी, पुनम पार्क), प्रभाग १० (हॉली स्पिरिट, फीलिया, वृंदावन पार्क, साईनगर) मध्ये देखील मतदार संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे.

शहराच्या उर्वरित आठ प्रभागांमध्ये मतदारसंघ वाढ झाली असून प्रभाग क्रमांक ९ (नवापाडा, अल्याळी, वळणनाका, खानपाडा,) येथे ५९३ मतदार वाढले आहेत. याखेरीज प्रभाग १२ (कमला पार्क, मिडल क्लास सोसायटी, विजयनगर, लक्ष्मीनारायण मंदिर) मध्ये २०३ मतदार वाढले असून प्रभाग २ (वेवूर, घोलवीरा, वीरेंद्रनगर, गणेश नगर), प्रभाग ४ (आंबेडकर नगर, नवली, इस्कॉन मंदिर) येथे १०० पेक्षा अधिक मतदार संख्या वाढल्याने या ठिकाणी निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पालघर शहरात भाजपा, शिवसेना तसेच महाविकास आघाडी निवडणूक लढवण्याची शक्यता असून या निवडणुका प्रामुख्याने तिरंगी होण्याची शक्यता आहे. १५५६ ते ५२६४ मतदार संख्या असणाऱ्या प्रभागांमध्ये अतीतटीच्या लढती होऊन वाढलेले किंवा कमी झालेल्या मतदार संख्या निकालासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

३०००- ५००० मतदारांचे प्रभाग

पालघर शहरा मधील अंतिम मतदार यादी पाहता सहा प्रभागांमध्ये ३००० ते ४००० मतदार तर पाच प्रभागांमध्ये ४००० ते ५००० मतदार संख्या आहे. प्रत्येकी एका प्रभागामध्ये २००० मतदारांपेक्षा कमी व ५००० पेक्षा अधिक मतदार संख्या असून दोन प्रभागांमध्ये २००० ते ३००० मतदार आहेत.

२०१९ निवडणुकीच्या तुलनेत ७८७७ मतदार वाढले

सन २०१९ मध्ये झालेल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत १४ प्रभागांमध्ये ४७,८५० मतदार संख्या पात्र ठरली होती. सन २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अंतिम मतदार संख्या ५५,७२७ झाली असून दरम्यानच्या काळात ७८७७ मतदार वाढल्याचे दिसून आले आहे.

प्रभाग निहाय प्रकाशित झालेल्या प्रारूप यादी संदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व आक्षेप यांचा अभ्यास करून तसेच प्रत्यक्षपणे स्थळ पाहणी करून अंतिम मतदार यादीत बदल करण्यात आले आहेत. – प्रशांत जाधव, मुख्याधिकारी पालघर.