आदिवासी तरुणाचे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा :  पालघर जिल्ह्यतील दुर्गम अशा जव्हार तालुक्यातील कोगदे या गावातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील डॉ. अजय काशिराम डोके यांनी नुकत्याच काल जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात  यश संपादित केले आहे आणि सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. 

डॉ. अजय डोके यांचे प्राथमिक शिक्षण जव्हार तालुक्यातील प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण ब्रह्मा व्हॅली या संस्थेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर केईएम या मानांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. अजयचे वडील काशिराम डोके डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी येथे आरोग्यसेवक पदावर कार्यरत आहेत.

वडील आरोग्य विभागात असल्याने आपला मुलगाही डॉक्टर व्हावा ही वडिलांची इच्छा होती. तीही अजय यांनी पूर्ण केली. तिथेच न थांबता अजय यांना सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली  आणि पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवले.  त्यांचा देशात ७०५ क्रमांक आला आहे.  अजय हे अतिशय शांत, संवेदनशील, मितभाषी, प्रेमळ स्वभावाचे आहेत. प्रचंड जिद्द, अपरिमित परिश्रम आणि संयम यामुळे त्यांना यश संपादन करता आले आहे.

डॉ. अजय डोके यांनी के. ई. एम. रुग्णालय, मुंबई येथून एमबीबीएस पदवी पूर्ण करून सध्या ते डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तवा येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्याच्या या यशामुळे जव्हार तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. डॉ. अजय डोके यांचे समाजमाध्यमांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षांव होत आहे. जव्हारसारख्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकूनही अजय डोके यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेत शिकत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

मी सुरुवातीपासूनच मेहनत आणि अभ्यास याला महत्त्व देत आलो. यूपीएएसीसारख्या परीक्षेची तयारी करणाऱ्या बांधवांना मी इतकेच सांगू इच्छितो की, कुठलेही महागडे क्लास न लावताही तुम्ही घरी राहून इंटरनेटवरील माहितीचा अभ्यास करून यशस्वी होऊ शकता. फक्त तुमच्यामध्ये तेवढी प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यास करण्याची तयारी असायला पाहिजे.

-डॉ. अजय डोके, जव्हार

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success first attempt health worker son upsc ssh
First published on: 28-09-2021 at 01:35 IST