बस रस्त्यात सातत्याने बंद पडत असल्यामुळे प्रवासी त्रस्त
वाडा : वाडा आगारातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत. तरीही त्या बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या बस मार्गस्थ असताना अनेकवेळा रस्त्यात बंद पडत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
वाडा आगारात एकूण ५५ बस संख्या आहे. यामधील निम्म्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ग्रामीण भागांत फेऱ्या मारत आहेत. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक बसगाडय़ांची अवस्था खिळखिळी झाली आहे. बस रस्त्यामध्ये कधीही बंद पडतात. काही बसगडय़ांच्या पत्र्याच्या शेडमधून पावसाच्या पाण्याची गळती होत असते.
आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी एसटी हे महत्त्वाचे प्रवासी वाहतुकीचे साधन आहे. मात्र सध्या एसटी महामंडळाचे या सेवेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, असे वाडा येथील प्रवासी प्रल्हाद सावंत यांनी सांगितले आहे.
पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे बस नादुरुस्त होत आहेत. येथील कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करून प्रवाशांच्या चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करीत आहेत.
-मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक, वाडा आगार.