Western Railway / बोईसर : मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या बलसाड फास्ट पॅसेंजर च्या इंजिनला आग लागल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. इंजिन मधून धूर येत असल्याचे लक्षात येताच पॅसेंजर केळवे स्थानकावर थांबवण्यात आली. त्यानंतर पॅसेंजर मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई सेंट्रल स्थानकातून संध्याकाळी ६.१० मिनिटांनी सुटलेली बलसाड फास्ट पॅसेंजर (59023) ही गाडी संध्याकाळी ७.४० मिनिटांच्या सुमारास केळवे स्थानकात पोचल्यानंतर इंजिन मधून धूर निघत असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आल्यानंतर केळवे स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतर लगेचच इंजिनमध्ये आग भडकली. इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच गाडीतील सर्व प्रवाशांना केळवे रेल्वे स्थानकात सुरक्षितपणे उतरविण्यात आले असून रेल्वे प्रशासनाकडून इंजिनला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीमुळे पश्चिम रेल्वेची डहाणू पर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्यांच्या गाड्या प्रभावित झाल्या आहेत.
सध्या आग लागलेले इंजिन गाडी पासुन वेगळं करण्यात आहे. दरम्यान गुजरात कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसई विरार सह काही रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आले आहेत इंजिनला आग लागल्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे.